India vs England 4th test 2021 cricket match live scorecard updates : टीम इंडियाची गाडी सेट झालीय असं वाटत असताना इंग्लंडच्या ऑली रॉबिन्सन यानं कमाल केली. रोहित शर्मा व चेतेश्वर पुजारा यांनी दुसऱ्या विकेटसाठी २७८ चेंडूंत १५३ धावांची भागीदारी करताना विक्रम केला. टीम इंडिया मोठ्या आघाडीच्या दिशेनं कूच करत आहेत, असे दिसत असतानाच इंग्लंडनं मोठे धक्के दिले. रोहित व चेतेश्वर पुजारा एकाच षटकात माघारी परतल्यानं टीम इंडियाची नवी जोडी मैदानावर आहे. याही डावात रवींद्र जडेजाला पाचव्या क्रमांकावर अजिंक्य रहाणेच्या जागी बढती दिली गेली. अंधुक प्रकाशामुळे तिसऱ्या दिवसाचा खेळ १३ षटकं आधीच थांबवण्यात आला.
कर्णधार विराट कोहली व रवींद्र जडेजा खेळपट्टीवर आहेत. विराटनं ३७ चेंडूंत नाबाद २२ धावा केल्या आहेत. भारतानं तिसऱ्या दिवसअखेर ३ बाद २७० धावा करून १७१ धावांची आघाडी घेतली आहे.
रोहित-लोकेश जोडीनं मोडला ८५ वर्षांपूर्वीचा विक्रमरोहित शर्मा व लोकेश राहुल या जोडीनं आज १९३६ सालचा विक्रम मोडला. लोकेश व रोहित यांनी यावेळी इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय सलामीवीरांमध्ये दुसरे स्थान पटकावले. लोकेश व रोहित यांनी या मालिकेत ३६७* धावांची भागीदारी केली आहे. इंग्लंडमध्ये सर्वात यशस्वी भारतीय सलामीवीरांमध्ये सुनील गावस्कर व चेतन चौहान ही जोडी आघाडीवर आहे. त्यांनी १९७९च्या मालिकेत ४५३ धावा जोडल्या होत्या. रोहित व लोकेश यांनी ८५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला. १९३६मध्ये विजय मर्चंट व सय्यद मुश्ताक अली यांनी ३६६ धावा जोडल्या होत्या.
रोहित शर्माच्या सलामीवीर म्हणून ११ हजार आंतरराष्ट्रीय धावा रोहितनं तिसऱ्या दिवशी २६वी धाव काढून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून ११ हजार धावा पूर्ण केल्या. अशी कामगिरी करणारा तो चौथा भारतीय फलंदाज ठरला. सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर व वीरेंद्र सेहवाग यांनी हा पराक्रम केला आहे. सचिनंतर ( २४१ डाव) सर्वात कमी २४६ डावांमध्ये रोहितनं ही कामगिरी केली आहे. सध्या खेळत असलेल्या सलामीवीरांमध्ये सर्वाधिक धावा ख्रिस गेलच्या ( १८८४७) नावावर आहेत. त्यानंतर डेव्डिड वॉर्नर ( १४८०३), तमिम इक्बाल ( १४१७३), रोहित ( ११०००*), मार्टीन गुप्तील ( १०९७६) व शिखर धवन ( १०१७८) असा क्रमांक येतो.