India vs England 4th test 2021 cricket match live scorecard updates : रोहित शर्मा ( Rohit Sharma) चौथ्या कसोटीत वेगळ्यात रुपात दिसला. हिटमॅन रोहितचा संयमी खेळ पाहून सारेच चकित झाले. त्यानं या कसोटीत दमदार खेळ करून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १५ हजार, सलामीवीर म्हणून ११ हजार आंतरराष्ट्रीय धावा करणारा चौथा भारतीय आणि कसोटीत ३ हजार धावा... असे अनेक विक्रम मोडले. त्यानं कसोटी क्रिकेटमधील ८वे शतक पूर्ण केले आणि त्याचे हे परदेशातील पहिलेच शतक ठरले. सलामीवीर म्हणून तीनही फॉरमॅटमध्ये इंग्लंडमध्ये शतक करणारा तो जगातला पहिला परदेशी फलंदाज ठरला. रोहितनं खणखणीत षटकार खेचून २०५ चेंडूंत शतक पूर्ण केलं.
लोकेश राहुल व रोहित यांनी टीम इंडियाला चांगली सुरुवात करून दिली. दोघांनीही कोणताच धोका न पत्करता संयमानं खेळ केला. बाहेर जाणाऱ्या चेंडूवर फटके मारण्याचा मोह त्यांनी कटाक्षानं टाळला अन् हेच त्यांच्या यशस्वी भागीदारीचे गमक ठरले. रोरी बर्न्सनं दिलेल्या दोन जीवदानांचा पुरेपूर फायदा रोहितनं उचलला. लोकेशही अर्धशतकानजीक होता, परंतु इंग्लंडचा अनुभवी गोलंदाज जेम्स अँडरसननं ही भागीदारी तोडली. अँडरसनचा इनस्वींग चेंडू लोकेशच्या बॅटची हलकीशी किनार घेत यष्टिरक्षकाच्या हाती विसावला. लोकेश ४६ धावांवर माघारी परतला.
रोहितनं त्यानंतर चेतेश्वर पुजारासह संयमी खेळ सुरूच ठेवला. या दोघांनीही चांगली भागादी करताना टीम इंडियाची आघाडी आणखी वाढवली. रोहितनं या मालिकेतील तिसरे अर्धशतक पूर्ण करताना इंग्लंड दौऱ्यावर एकाच कसोटी मालिकेत तीन अर्धशतक करणाऱ्या मुरली विजय ( २०१४) व दिनेश कार्तिक ( २००७) यांच्याशी बरोबरी केली. दरम्यान, एक धाव घेताना पुजाराचा पाय मुरगळला अन् त्याला होत असलेल्या प्रचंड वेदना चेहऱ्यावरून स्पष्ट जाणवत होता. प्राथमिक उपचार घेत पुन्हा मैदानावर उभा राहिला आणि काही सुरेख चौकारही खेचले.