भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना आजपासून रांची येथे खेळला जाणार आहे. या लढतीत इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. आजच्या सामन्यासाठी भारतीय संघामध्ये युवा आकाश दीप याला स्थान देण्यात आलं आहे. प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी त्याला टेस्ट कॅप प्रदान केली. पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेमध्ये पहिला सामना गमावल्यानंतर भारतीय संघानं पुढचे दोन सामने जिंकून २-१ अशी आघाडी घेतली आहे.
रांची येथील खेळपट्टी सामन्याच्या उत्तरार्धात फिरकी गोलंदाजीला अनुकूल ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूने लागताच इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. चौथ्या कसोटीसाठी इंग्लंडच्या संघात दोन बदल करण्यात आले असून, ओली रॉबिन्सन आणि शोएब बशीर यांचा संघात समावेश करण्यात आला आहे.
भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक हरल्यानंतर काहीशी निराशा व्यक्त केली. तसेच खेळपट्टीचं स्वरूप पाहता आपणही प्रथम फलंदाजीसाठी इच्थिक होतो असे सांगितले. जसप्रीत बुमराह याला या कसोटीसाठी संघातून विश्रांती देण्यात आल्याने युवा आकाश दीप याला पदार्पणाची संधी मिळाली आहे. तर मागच्या कसोटीत खेळलेल्या रजत पाटीदार, सरफराज खान आणि यष्टीरक्षक ध्रुव जुरेल यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे.
चौथ्या कसोटीसाठीचे दोन्ही संघभारतीय संघ - रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप.इंग्लंडचा संघ - झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, बेन स्टोक्स (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स, टॉम हार्टली, ओली रॉबिन्सन, शोएब बशीर, जेम्स अँडरसन