Rohit Sharma, IND vs ENG 4th Test: भारतीय संघ आता इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत २-१ ने पुढे आहे. रांचीमधील चौथा सामना जिंकून मालिका जिंकण्याचा भारताचा मानस आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा सामना उद्यापासून खेळवला जाणार आहे. रांचीच्या सामन्यात भारताचा एक स्टार क्रिकेटपटू संघात पुनरागमन करण्याची दाट शक्यता आहे. पाहूया कसा असू शकेल इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीसाठी भारताचा संघ.
टॉप-५ मध्ये नव्या खेळाडूची एन्ट्री?
सध्या भारतीय संघाची वरची फळी मजबूत आहे. कर्णधार रोहित शर्मासोबत यशस्वी जैस्वाल दमदार कामगिरी करताना दिसत आहे. या दोघांना वरच्या फळीत शुबमन गिलदेखील चांगली साथसंगत करताना दिसत आहे. अशा परिस्थितीत वरच्या फळीतील खेळाडू बदलण्याची फारशी गरज असल्याचे दिसत नाही. मधल्या फळीचा विचार करायचा झाल्यास, महत्त्वाचा भाग म्हणजे देवदत्त पडिक्कलला चौथ्या क्रमांकावर संधी मिळू शकते. रजत पाटीदारला दोन कसोटी सामन्यांत संधी मिळूनही तो अपयशी ठरला. त्यामुळे त्याच्या जागी पडीक्कलला संधी दिली जाऊ शकते. त्यानंतर सध्या चांगल्या फॉर्मात असलेला सर्फराज खान पाचव्या क्रमांकावर जबाबदारी चोख बजावत आहे.
स्टार खेळाडूचं संघात पुनरागमन होण्याची शक्यता
रांची येथे होणाऱ्या इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात अष्टपैलू रवींद्र जाडेजाला सहाव्या क्रमांकावर निवडले जाऊ शकते. रवींद्र जाडेजा फलंदाजी आणि गोलंदाजीत उत्तम कामगिरी करत आहेत. तसेच, यष्टीरक्षक फलंदाज म्हणून ध्रुव जुरेलला प्लेइंग इलेव्हनमध्ये कायम ठेवणे जवळपास निश्चित आहे. या दोघांच्यासोबत एका स्टार खेळाडूचे कमबॅक होऊ शकते. रांचीची खेळपट्टी फिरकीपटूंसाठी उपयुक्त असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे अक्षर पटेलला संघात पुन्हा एकदा स्थान मिळू शकते. त्याच्या समावेशाने फलंदाजीतही भारताला थोडे बळ मिळू शकते.
गोलंदाजीबाबत नवे समीकरण?
भारतीय संघ व्यवस्थापन जाडेजा आणि अक्षर सोबत रविचंद्रन अश्विन आणि कुलदीप यादव असे चार फिरकीपटू उतरवू शकेल. जसप्रीत बुमराला विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे अनुभवी वेगवान गोलंदाजाला संधी मिळण्याची शक्यता जास्त आहे. अशा वेळी मुकेश कुमार किंवा आकाशदीप यांच्यापेक्षाही संघात मोहम्मद सिराजला स्थान मिळणे जास्त संयुक्तिक वाटत आहे.
इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीसाठी असा असू शकतो भारताचा संभाव्य संघ-रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, देवदत्त पडिक्कल, सरफराज खान, रवींद्र जाडेजा, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज.