Join us  

IND vs ENG: भारताने इंग्लंडच्या तोंडचा घास पळवला; द्रविडच्या 'त्या' ओळींनी गिलला केले प्रेरीत 

Shubman Gill: भारतीय संघाने इंग्लंडविरूद्धच्या कसोटी मालिकेत विजयी आघाडी घेतली आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2024 11:54 AM

Open in App

IND vs ENG 4th Test: भारतीय संघाने मायदेशात सुरू असलेल्या इंग्लंडविरूद्धच्या कसोटी मालिकेत शानदार विजय मिळवला. रांची येथे खेळल्या गेलेल्या ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथ्या सामन्यात भारताने इंग्लंडचा ५ गडी राखून पराभव केला. यासह भारताने इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत ३-१ अशी विजयी आघाडी घेतली आहे. पहिला सामना इंग्लंडने जिंकला पण त्यानंतर भारताने विजयाची हॅटट्रिक केली. या सामन्यात एक वेळ अशी आली जेव्हा टीम इंडिया मोठ्या अडचणीत सापडली. पण, शुबमन गिल आणि ध्रुव जुरेल या युवा जोडीने भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. 

भारतीय संघाच्या विजयानंतर शुबमन गिलने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. गिलने पोस्टच्या कॅप्शनच्या माध्यमातून प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या ओळी लिहिल्या. गिलने राहुल द्रविड यांच्या प्रशिक्षकाखाली अंडर-१९ विश्वचषकही खेळला आहे. भारतीय फलंदाजाने त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले, "अगर तुम नहीं तो कौन? अगर अब नहीं तो कब? - राहुल द्रविड."

भारताची विजयी आघाडी दरम्यान, टीम इंडियाने चौथ्या दिवशी ४० च्या धावसंख्येसह आपला दुसरा डाव पुढे नेला. एकेकाळी संघाची धावसंख्या एकही गडी न गमावता ८४ एवढी होती. पण नंतर ती ५ बाद १२० अशी झाली. ज्यामध्ये कर्णधार रोहित शर्माच्या ५५ धावा आणि विकेटचाही समावेश होता. शुबमन गिल आणि ध्रुव जुरेल यांच्या मॅचविनिंग भागीदारीमुळे भारताचा विजय शक्य झाला. दोन्ही युवा फलंदाजांमध्ये नाबाद ७२ धावांची भागीदारी झाली. शुबमन गिल (नाबाद ५२) आणि ध्रुव जुरेलने ३९ धावांची नाबाद खेळी केली.

ध्रुव जुरेलने या आधी पहिल्या डावात ९० धावांची झंझावाती खेळी केली होती. धर्मशाला येथे ७ मार्चपासून सुरू होणारा एक सामना शिल्लक असताना भारताने ३-१ अशी विजयी आघाडी घेऊन मालिका जिंकली आहे. खरं तर भारताने घरच्या मैदानावर सलग १७ वी मालिका जिंकली. त्याचबरोबर बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने पहिल्यांदाच मालिका गमावली आहे.

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडशुभमन गिलभारतीय क्रिकेट संघराहुल द्रविड