India vs England 5th Test : भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत ३-१ अशी विजयी आघाडी घेतली आहे आणि पाचवी कसोटी ७ मार्चपासून धर्मशाला येथे खेळवण्यात येणार आहे. पण, पाचव्या कसोटीपूर्वी भारतीय संघासाठी मोठी बातमी आली आहे. दुसऱ्या कसोटीत दुखापतीमुळे माघार घेणाऱ्या लोकेश राहुल ( KL Rahul) पाचव्या कसोटीत पुनरागमन करेल, अशी शक्यता होती. पण, त्याच्या सहभागाबाबत अजूनही संभ्रम आहे. लोकेश राहुल उपचारासाठी लंडनला पोहोचला आहे. त्याला ही दुखापत कशी झाली किंवा जुनी दुखापत आहे का याबाबत सध्या कोणतीही माहिती नाही.
क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार, राजकोटमधील तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी ९० टक्के तंदुरुस्त मानला गेलेला राहुल धर्मशाला येथील पाचव्या कसोटी सामन्यासाठी अजूनही पूर्णपणे तंदुरुस्त नाही. अशा परिस्थितीत BCCI राष्ट्रीय क्रिकेट अकादमीला प्रश्न विचारू शकते. त्याच्यावर लंडनमधील तज्ज्ञांकडून उपचार करण्यात येणार असल्याचेही अहवालात सांगण्यात आले आहे.
लोकेश राहुलला हैदराबादमधील पहिल्या कसोटी सामन्यात दुखापत झाली होती आणि तेव्हापासून तो बाहेर आहे. ही दुखापत त्याच्या उजव्या क्वॅड्रिसिपमध्ये असल्याचे अहवालात म्हटले आहे आणि ही तीच दुखापत आहे ज्यासाठी गेल्या वर्षी त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. अशा परिस्थितीत बोर्डाला राहुलबाबत कोणताही धोका पत्करायचा नाही, त्यामुळे त्याला पुन्हा उपचारासाठी लंडनला पाठवण्यात आले आहे.
हैदराबादमधील पहिल्या कसोटीनंतर, खबरदारी म्हणून त्याला विशाखापट्टणममधील दुसऱ्या सामन्यासाठी विश्रांती देण्यात आली होती. तो तिसऱ्या सामन्यात पुनरागमन करेल अशी आशा होती, पण, गोष्टी योजनेनुसार झाल्या नाहीत. BCCI ने चौथ्या कसोटीत राहुलला संघातून वगळण्याचा निर्णय घेतला. धर्मशाला येथे होणाऱ्या अंतिम कसोटी सामन्यात त्याचा सहभाग फिटनेसच्या अधीन असल्याचेही बोर्डाने स्पष्ट केले. लोकेश पाचव्या कसोटीला मुकण्याची शक्यता अधिक आहेत. त्याचे पुनरागमन थेट आयपीएल २०२४ मधून होईल.