India vs England 5th Test ( Marathi News ) : भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध पाचवी कसोटी लढत खेळण्यासाठी नवीन डावपेच आखत आहे. ७ मार्चपासून धर्मशाला येथे पाचवी कसोटी खेळवण्यात येणार आहे. पाचव्या कसोटीत लोकेश राहुल याच्या खेळण्याबाबत अजूनही सस्पेन्स आहे. त्याच्या दुखापतीचं नेमकं कारण राष्ट्रीय क्रिकेट अकादमीतील वैद्यकीय टीमला शोधता आलेले नाही आणि तो लंडनमध्ये जाणार आहे. त्यात मालिका ३-१ अशी जिंकल्यानंतर जसप्रीत बुमराहला दिलेली विश्रांती अधिक वाढवायची का, असाही विचार सुरू आहे. त्यात या कसोटीत आणखी काही खेळाडूंना विश्रांती दिली जाऊ शकते.
या मालिकेत भारतीय संघातील काही खेळाडूंना वर्कलोड मॅनेजमेंटचा भाग म्हणून काही सामन्यांसाठी विश्रांती दिली गेली आहेच. मोहम्मद सिराजला तिसऱ्या कसोटीसाठी विश्रांती दिली गेली होती. त्यानंतर रांची कसोटीत जसप्रीत बुमराहला विश्रांती दिली गेली. लोकेश राहुल व रवींद्र जडेजा यांना दुसऱ्या कसोटीत दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली होती. आता पाचव्या कसोटीत काही खेळाडूंना विश्रांती दिली जाऊ शकते, असे वृत्त क्रिकबजने दिले आहे. पण, हे खेळाडू कोण असतील अद्याप स्पष्ट झालेले नाही.
भारतीय संघाने या मालिकेत रजत पाटीदार, सर्फराज खान, आकाश दीप व ध्रुव जुरेल या युवा खेळाडूंना पदार्पणाची संधी दिली. पाटीदार सोडल्यास उर्वरित तिन्ही खेळाडूंनी संधींचं सोनं केलं आहे. लोकेश पाचव्या कसोटीसाठी तंदुरुस्त न झाल्यास पाटीदारला आणखी एक संधी दिली जाऊ शकते किंवा देवदत्त पडिक्कलला संधी मिळू शकते. वॉशिंग्टन सुंदर रणजी करंडक स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी तामिळनाडू संघाकडून खेळताना दिसू शकतो.
शेवटच्या तीन कसोटी सामन्यांसाठी भारतात संघ- रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, देवदत्त पडीक्कल, रजत पाटीदार, सर्फराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, आकाश दीप