Racial Abuse IND vs ENG 5th Test: टीम इंडिया सध्या इंग्लंडच्या दौऱ्यावर असून एजबॅस्टन येथे दोन्ही संघांमध्ये पाचवा कसोटी सामना खेळला जात आहे. या कसोटी सामन्यात भारतीय संघाने पहिल्या डावात ४१६ धावा तर दुसऱ्या डावात २४५ धावा केल्या. इंग्लंडचा पहिला डाव २८४ धावांत आटोपल्या. टीम इंडियाने दुसऱ्या डावात इंग्लंडला ३७८ धावांचे लक्ष्य दिले. प्रत्युत्तरात चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडने ३ बाद २५९ धावा केल्या. आता पाचव्या दिवशी इंग्लंडला विजयासाठी ११९ धावांची गरज आहे. याच दरम्यान, सामन्याच्या चौथ्या दिवशी (४ जुलै) स्टँडमध्ये बसलेल्या काही भारतीय प्रेक्षकांना इंग्लंड संघाच्या चाहत्यांनी वाईट वागणूक दिली. भारतीयांवर वर्णद्वेषी टिप्पणी केल्याचे सांगण्यात आले. एजबॅस्टनच्या अधिकाऱ्यांना हे कळताच त्यांनी चाहत्यांची माफी मागितली आणि चौकशी करण्याचे आदेश दिले. क्रिकेटमध्ये वर्णद्वेषाला स्थान नाही, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
अधिकाऱ्यांनी काय दिली प्रतिक्रिया
एजबॅस्टनचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणाले, 'आम्ही एजबॅस्टनमध्ये सर्वांसाठी सुरक्षित आणि स्वागतार्ह वातावरण निर्माण करत आहोत. वर्णद्वेषी टिप्पणी झाल्याची गोष्ट ऐकून मला धक्का बसला. ट्विटनंतर मी त्या व्यक्तीशी वैयक्तिकरित्या बोललो आणि या प्रकरणाची चौकशी सुरू केली. एजबॅस्टनमध्ये कोणालाही अशी वागणूक देऊ नये. या प्रकरणाची त्वरित चौकशी केली जाईल.'
भारतीय चाहत्याने काय केली तक्रार
रीना नावाच्या एका भारतीय महिला फॅनने याबाबतची गोष्ट उघड केली. ती म्हणाली की, आम्ही दोन्ही संघांच्या दिग्गज खेळाडूंना पाहण्यासाठी आणि खेळ पाहण्यासाठी आलो होतो. तीन दिवस इतर चाहत्यांसोबत आम्ही सामन्याचा आनंद लुटला, पण आज जो अनुभव आला तो वाईट होता. बऱ्याच दिवसांपासून या सामन्याची आम्ही वाट पाहत होतो, पण त्यातच आम्हाला दुःखद अनुभव आला.
एका युजरने ही घटना सोशल मीडियावर शेअर केल्यावर ही बाब समोर आली. त्याने लिहिले की, एरिक हॉलीजने स्टँडमध्ये असलेल्या भारतीय चाहत्यांबद्दल वर्णद्वेषी टिप्पणी केली. तर दुसऱ्या युजरने याबाबत म्हटले की, 'सामन्यादरम्यान भारतीय प्रेक्षकांना सामोरे जावे लागलेले सर्वात वाईट वर्तन आहे. सर्वात घृणास्पद प्रकार आहे.'