Jasprit Bumrah vs Ben Stokes, IND vs ENG 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाचव्या कसोटी सामन्याचा आज तिसरा दिवस आहे. भारतीय संघ सध्या पाच सामन्यांच्या मालिकेत २-१ ने आघाडीवर आहे. टीम इंडिया या मॅचमध्ये ड्रॉ किंवा जिंकली तर सीरिज विजय मिळवू शकेल. भारताने २००७ साली इंग्लंडमध्ये शेवटची कसोटी मालिका जिंकली होती. त्यामुळे यंदा हा पराक्रम केल्यास टीम इंडियासाठी ही बाब खूपच अभिमास्पद ठरेल. त्या दृष्टीने भारतीय कर्णधार जसप्रीत बुमराहचा खेळ सुरू आहे. फलंदाजी करताना इंग्लंडची धुलाई केल्यानंतर त्याने गोलंदाजीतही आपली धार दाखवून दिली.
तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्ससोबत एक विचित्र घटना घडली. खरं तर, बुमराहचा बॅक ऑफ लेन्थ बॉल स्टोक्सच्या बॅटला लागला होता, पण चेंडूचा वेग प्रचंड असल्याने चेंडू बॅटला लागून थेट नको त्या ठिकाणी जाऊन लागला. अशा स्थितीत बेन स्टोक्स कळवळला अन् पटकन जागच्या जागी जमिनीवर बसला. इंग्लंडच्या पहिल्या डावातील ३१ व्या षटकात हा प्रकार घडला.
घडलेल्या प्रकारानंतर स्टोक्स २५ धावा करून बाद झाला. बेन स्टोक्सला पहिल्या डावात फार काही करता आले नाही. त्याला केवळ २५ धावा करणं शक्य झालं. मात्र, जॉनी बेअरस्टोसोबत स्टोक्सने सहाव्या विकेटसाठी ६६ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. स्टोक्सचा झेल जसप्रीत बुमराहनेच टिपला. शार्दुल ठाकूर ने त्याला झेलबाद केले. बुमराहचा झेल पाहण्यासारखा होता. स्टोक्सने ३६ चेंडूंवर चार चौकारांसह २५ धावा केल्या.