India vs England 5th Test Live update ( Marathi News ) : भारत-इंग्लंड यांच्यातल्या मालिकेतील पाचवी आणि शेवटची कसोटी आजपासून सुरू झाली आणि इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. रजत पाटीदारला दुखापतीमुळे आजच्या सामन्याला मुकावे लागल्याने देवदत्त पड्डिकलला पदार्पणाची कॅप मिळाली. जसप्रीत बुमराहचे पुनरागमन झाल्याने आकाश दीपला आज आराम करावा लागला. भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या हस्ते आर अश्विनला १००व्या कसोटीची कॅप दिली गेली.. यावेळी अश्विनची पत्नी व दोन मुली उपस्थित होत्या. भारतीय खेळाडूंनी अश्विनला Guard of Honour दिला.
१०० कसोटी सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारा अश्विन हा १४वा आणि एकूण ७७वा क्रिकेटपटू ठरला आहे. अश्विनपूर्वी ही कामगिरी करणाऱ्या १३ भारतीय खेळाडूंमध्ये सुनील गावस्कर ( १२५ ), दिलीप वेंगसरकर ( ११६ ), कपिल देव ( १३१ ), सचिन तेंडुलकर ( २०० ), अनिल कुंबळे ( १३२ ), राहुल द्रविड ( १६४ ), सौरव गांगुली ( ११३ ), व्हीव्हीएस लक्ष्मण ( १३४ ), हरभजन सिंग ( १०३ ), वीरेंद्र सेहवाग ( १०४ ), इशांत शर्मा ( १०५ ), विराट कोहली ( ११३ ) आणि चेतेश्वर पुजारा ( १०३) यांचा समावेश आहे.
३७ वर्ष व १७२ दिवसांचा अश्विन हा १०० वी कसोटी खेळणारा सर्वात वयस्कर भारतीय खेळाडू असेल. जेफ्री बॉयकॉट ( ४० वर्ष व २५४ दिवस), क्लाइव्ह लॉईड ( ३९ वर्ष व २४१ दिवस ), ग्रॅहम गूच ( ३९ वर्ष व १९० दिवस ), गॉर्डन ग्रीनिज ( ३८ वर्ष व ३४६ दिवस ) आणि युनिस खान ( ३७ वर्ष व २०८ दिवस ) यांच्यानंतर अश्विन हा सहाव्या क्रमांकाचा सर्वात वयस्कर खेळाडू आहे. सौरव गांगुली ( ३५ वर्ष व १७१ दिवस ), सुनील गावस्कर ( ३५ वर्ष व ९९ दिवस ), अनिल कुंबळे ( ३५ वर्ष व ६२ दिवस ) आणि चेतेश्वर पुजारा ( ३५ वर्ष व २३ दिवस ) यांनी ३५ वर्षांचे झाल्यानंतर १०० व्या कसोटीत प्रवेश केला होता.