Ind Vs Eng test Match live : रोहित शर्मा व लोकेश राहुल हे दोन्ही सलामीवीर या सामन्याला मुकल्यानंतर चेतेश्वर पुजारा ( Cheteshwar Pujara) याने ही जबाबदारी घेतली. त्याने हनुमा विहारी ( ३९), विराट कोहली ( ३२) व रिषभ पंत ( ७८) यांच्यासह टीम इंडियाचा विजय आता पक्का केला आहे. चेतेश्वर पुजारा १६८ चेंडूंत ८ चौकारांसह ६६ धावांवर माघारी परतला. पण, टीम इंडियाने घेतलेली मजबूत आघाडी ओलांडणे अशक्य आहे. त्यासाठी इंग्लंडला २००८ साली दक्षिण आफ्रिकेकडून झालेल्या जादूची पुनरावृत्ती करावी लागेल.
टीम इंडियाच्या पहिल्या डावातील ४१६ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचा संपूर्ण संघ २८४ धावांत तंबूत परतला. तिसऱ्या दिवशी जॉनी बेअरस्टो व बेन स्टोक्स ( २५) यांनी सहाव्या विकेटसाठी ७५ चेंडूंत ६६ धावांची भागीदारी केली. बेअरस्टो व सॅम बिलिंग्स यांनी ४९ चेंडूंत ५१ धावांची भागीदारी केली. बेअरस्टो १४० चेंडूंत १४ चौकार व २ षटकारांच्या मदतीने १०६ धावांवर बाद झाला. भारताने पहिल्या डावात १३२ धावांची आघाडी घेतली. मोहम्मद सिराज ( ४-६६), जसप्रीत बुमराह ( ३-६८), मोहम्मद शमी ( २-७८) व शार्दूल ठाकूर ( १-४८) या जलदगती गोलंदाजांनी भारताला आघाडी मिळवून दिली.
भारताच्या दुसऱ्या डावाची सुरुवात फार चांगली झाली नाही. शुबमन गिल ( ४), हनुमा विहारी ( ११) व विराट कोहली (२०) माघारी परतले. चेतेश्वर पुजारा ( Cheteshwar Pujara) व रिषभ पंत ( Rishabh Pant) यांनी भारताचा डाव सावरला आहे. पुजाराने १३९ चेंडूंचा सामना करताना इंग्लंडमधील त्याचे पाचवे अर्धशतक पूर्ण केले. त्याचे हे कसोटीतील ३३ वे अर्धशतक ठरले. दिवसाच्या अखेरच्या चेंडूवर रिषभ पंतला जीवदान मिळाले. भारताने दिवसअखेर ३ बाद १२५ धावा करताना २५७ धावांची आघाडी घेतली होती. एडबस्टन येथे ३६ वर्षांनंतर कसोटीत अर्धशतक झळकावणारा पुजारा हा भारताचा पहिला सलामीवीर ठरला. सुनील गावस्कर यांनी १९८६ साली येथे ५४ धावा केल्या होत्या.