Ind Vs Eng test Match live : खराब फॉर्मामुळे भारताच्या कसोटी संघातून वगळले... त्यानंतर रणजी करंडक स्पर्धेत स्वतःला सिद्ध करावे लागले... कौंटी क्रिकेटमध्ये खोऱ्याने धावा करताना पुन्हा कसोटी संघात स्थान पटकावले... रोहित शर्मा व लोकेश राहुल हे दोन्ही सलामीवीरांनी माघार घेतल्यानंतर ओपनरची जबाबदारी स्वीकारणाऱ्या चेतेश्वर पुजाराने ( Cheteshwar Pujara) इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटीत मोठ्या विक्रमाला गवसणी घातली. १९८६मध्ये भारताचे सलामीवीर सुनील गावस्कर यांनी एडबस्टन येथे एक पराक्रम केला होता आणि त्यानंतर भारताच्या सलामीवीराला येथे त्याची पुनरावृत्ती करण्यासाठी ३६ वर्ष लागली.
भारताच्या दुसऱ्या डावाची सुरुवात फार चांगली झाली नाही. शुबमन गिल ( ४), हनुमा विहारी ( ११) व विराट कोहली (२०) माघारी परतले. चेतेश्वर पुजारा ( Cheteshwar Pujara) व रिषभ पंत ( Rishabh Pant) यांनी भारताचा डाव सावरला आहे. पुजाराने १३९ चेंडूंचा सामना करताना इंग्लंडमधील त्याचे पाचवे अर्धशतक पूर्ण केले. त्याचे हे कसोटीतील ३३ वे अर्धशतक ठरले. दिवसाच्या अखेरच्या चेंडूवर रिषभ पंतला जीवदान मिळाले. भारताने दिवसअखेर ३ बाद १२५ धावा करताना २५७ धावांची आघाडी घेतली होती. एडबस्टन येथे ३६ वर्षांनंतर कसोटीत अर्धशतक झळकावणारा पुजारा हा भारताचा पहिला सलामीवीर ठरला. ( Cheteshwar Pujara is the first Indian opener in 36 years to score a Test fifty at Edgbaston.) सुनील गावस्कर यांनी १९८६ साली येथे ५४ धावा केल्या होत्या.