Ind Vs Eng test Match live : विराट कोहली त्याच्या ७१व्या आंतरराष्ट्रीय शतकाचा दुष्काळ दोन-अडीच वर्षानंतर येथेच संपवेल असे सर्वांना वाटले होते. पण, विराटचा खराब फॉर्म इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत कायम राहिला. पहिल्या डावात ११ धावांवर माघारी परतलेल्या विराटला दुसऱ्या डावात २० धावाच करता आल्या. पण, चेतेश्वर पुजारा ( Cheteshwar Pujara) व रिषभ पंत ( Rishabh Pant) यांनी भारताचा डाव सावरला आहे.
टीम इंडियाच्या पहिल्या डावातील ४१६ धावांचा पाठलाग करताना दुसऱ्या दिवसअखेर इंग्लंडचा निम्मा संघ ८४ धावांवर माघारी परतला होता. तिसऱ्या दिवशी जॉनी बेअरस्टो व बेन स्टोक्स ( २५) यांनी सहाव्या विकेटसाठी ७५ चेंडूंत ६६ धावांची भागीदारी केली. बेअरस्टो व सॅम बिलिंग्स यांनी ४९ चेंडूंत ५१ धावांची भागीदारी केली. बेअरस्टो १४० चेंडूंत १४ चौकार व २ षटकारांच्या मदतीने १०६ धावांवर बाद झाला. इंग्लंडचा पहिला डाव २८४ धावांवर गडगडला. भारताने पहिल्या डावात १३२ धावांची आघाडी घेतली. मोहम्मद सिराज ( ४-६६), जसप्रीत बुमराह ( ३-६८), मोहम्मद शमी ( २-७८) व शार्दूल ठाकूर ( १-४८) या जलदगती गोलंदाजांनी भारताला आघाडी मिळवून दिली.
भारताच्या दुसऱ्या डावाची सुरुवात फार चांगली झाली नाही. शुबमन गिल ( ४) जेम्स अँडरसनच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर हनुमा विहारी व चेतेश्वर पुजारी यांनी ३९ धावांची भागीदारी करून डाव सावरण्याचा प्रयत्न केला. विहारीला ( ११) स्टुअर्ट ब्रॉडने बाद केले. विराट कोहली येताच प्रेक्षकांनी जल्लोष केला, परंतु त्याला मोठी खेळी करता आली नाही. त्याने अँडरसनला सुरेख कव्हर ड्राईव्ह मारले, परंतु स्टोक्सने त्याला बाद केले. विराट २० धावांवर बाद झाला. पुजाराने तिसऱ्या विकेटसाठी विराटसह ३२ धावा जोडल्या. त्यानंतर रिषभ पंत आला अन् पुन्हा फटकेबाजीला सुरूवात झाली.