Ind Vs Eng test Match live : जो रूट ( Joe Root) याच्यापाठोपाठ जॉनी बेअरस्टो ( Jonny Bairstow) यानेही शतक झळकावून इंग्लंडचा विजय पक्का केला. बिनबाद १०७ वरून ३ बाद १०९ अशी अवस्था असताना रूट-बेअरस्टो जोडी मैदानावर आली अन् भारतीय गोलंदाजांचा पालापाचोळा केला. या दोघांनी ३१६ चेंडूंत २६९ धावांची नाबाद भागीदारी करताना ऐतिहासिक विजय मिळवून दिला. एडबस्टन कसोटीत आतापर्यंत २८४ धावांचा यशस्वी पाठलाग करता आला होता आणि इंग्लंडने आज ३७८ धावांचे लक्ष्य सर करून इतिहास रचला. इंग्लंडने ७ विकेट्स राखून ही कसोटी जिंकताना पाच सामन्यांची मालिका २-२ अशी बरोबरीत सोडवली आणि भारताचे २००७ नंतर इंग्लंडमध्ये कसोटी जिंकण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले.
- भारताने १९३२ मध्ये पहिल्यांदा इंग्लंड दौरा केला होता
- ९० वर्षांच्या इतिहासात भारताला इंग्लंडमध्ये पाच सामन्यांची कसोटी मालिका जिंकता आलेली नाही
- भारतीय संघ सध्या या कसोटी मालिकेत २-१ असा आघाडीवर होते, परंतु एडबस्टन कसोटीत इंग्लंडने बाजी मारली.
- भारताने २००७मध्ये येथे अखेरची कसोटी मालिका जिंकली होती, तेव्हा राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली ३ सामन्यांची मालिका १-० अशी जिंकली होती.
भारताच्या पहिल्या डावातील ४१६ धावांच्या प्रत्युत्तरात इंग्लंडचा पहिला डाव २८४ धावांवर गडगडला. १३२ धावांची आघाडी मिळवूनही भारताला दुसऱ्या डावात साजेशी कामगिरी करता आली नाही. चेतेश्वर पुजारा ( ६६) व रिषभ पंत ( ५७) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने २४५ धावांपर्यंत मजल मारली आणि इंग्लंडसमोर ३७८ धावांचे लक्ष्य ठेवण्यात ते यशस्वी झाले. भारताच्या ३७८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना जॅक क्रॅवली ( ४६) व अॅलेक्स लीज ( ५६) यांनी पहिल्या विकेटसाठी १०७ धावा जोडल्या अन् मजबूत पाया रचला. त्यानंतर भारताने २ धावांच्या अंतराने तीन विकेट्स घेत कमबॅक केले.
पण, जो रूट व जॉनी बेअरस्टो यांनी २०० धावांची भागीदारी करून सामना फिरवला व विक्रमाला गवसणी घातली. बेअरस्टोला १४ धावांवर दिलेले जीवदान महागात पडले. आर्टन आणि गूच यांनी १९९१ मध्ये चौथ्या डावात इंग्लंडसाठी द्विशतकी भागीदारी केली होती आणि त्यानंतर आज हा पराक्रम झाला. कसोटी क्रिकेटमध्ये रुटने २८ वे शतक झळकावून स्टीव्ह स्मिथ व विराट कोहली यांना ( २७ शतकं) मागे टाकले. जानेवारी २०२१नंतर रुटचे हे ११ वे कसोटी शतक ठरले. भारताविरुद्ध सर्वाधिक ९ शतकं करणारा रुट हा जगातील पहिला फलंदाज ठरला. शिवाय ग्रॅहम गूच यांच्यानंतर भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत ७००+ धावा करणाराही तो पहिला फलंदाज ठरला.
जॉनी बेअरस्टो १४५ चेंडूंत १५ चौकार व १ षटकारासह ११४ धावांवर, तर जो रूट १७३ चेंडूंत १९ चौकार व १ षटकारासह १४२ धावांवर नाबाद राहिला. इंग्लंडने पाचव्या दिवशी दीड तासांत ११९ धावा करून विजय पक्का केला.