Ind Vs Eng test Match live : बिनबाद १०७ वरून इंग्लंडची अवस्था ३ बाद १०९ झाली अन् टीम इंडियाने कमबॅकच्या दिशेने वाटचाल सुरू केली. भारताच्या ३७८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना झॅक क्रॅवली व अॅलेक्स लीज यांनी शतकी भागीदारी करून भारताच्या गोटात टेंशन वाढवले होते. पण, नवा चेंडू हाती येताच जसप्रीत बुमराहने ( Jasprit Bumrah) धाबे दणाणून सोडले. क्रॅवलीचा त्रिफळा उडवल्यानंतर त्याने ऑली पोपला शून्यावर बाद केले. या विकेटनंतर इंग्लंडचे फलंदाज गोंधळले अन् भारताला आणखी एक विकेट देऊन बसले. यानंतर विराट कोहलीचा ( Virat Kohli) जल्लोष पाहण्यासारखा होता.
जसप्रीत बुमराहचा भन्नाट चेंडू, इंग्लंडच्या फलंदाजाला कळण्याआधीच उडाल्या बेल्स; 'SENA' देशांत शतक
पहिल्या डावात ५ बाद ९८ वरून ४१६ धावांपर्यंत मजल मारणाऱ्या भारतीय संघाला दुसऱ्या डावात २४५ धावा करता आल्या. इंग्लंडचा पहिला डाव २८४ धावांवर गुंडाळून भारताने पहिल्या डावात १३२ धावांची आघाडी घेतली होती. त्यामुळे इंग्लंडसमोर विजयासाठी ३७८ धावांचे लक्ष्य ठेवले गेले. भारताच्या दुसऱ्या डावात चेतेश्वर पुजारा ( ६६) व रिषभ पंत (५७) यांनी अर्धशतक झळकावले. इंग्लंडचे सलामीवीर झॅक क्रॅवली व अॅलेक्स लीज यांनी उल्लेखनीय सुरुवात केली. इंग्लंडच्या ओपनर्सनी २० षटकांत शतकी भागीदारी पूर्ण केली आहे. बुमराहने पहिला धक्का दिला. त्याने क्रॅवलीचा त्रिफळा उडवला. टी ब्रेकनंतर बुमराहने इंग्लंडला आणखी एक धक्का देताना ओली पोपला माघारी पाठवले.
रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर लीजच्या बॅटला चेंडू लागून बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने गेला. लीज चेंडूकडे पाहत असताना नॉन स्ट्रायकर एंडवरून जॉनी बेअरस्टोने क्रिज सोडली. तेव्हा स्लिपमध्ये उभ्या असलेल्या विराटने मोहम्मद शमीला चेंडू जडेजाच्या दिशेने टाकण्यास सांगितले. लीज धाव पूर्ण करेपर्यंत चेंडू जडेजाच्या हातात आला अन् त्याने रन आऊट केले. लीज ५६ धावांवर माघारी परतल्यानंतर विराट कोहलीने भारी जल्लोष केला.