Ind Vs Eng test Match live : जॉनी बेअरस्टोने ( Jonny Bairstow) आणखी एक शतकी खेळी करताना टीम इंडियाला कडवी टक्कर दिली. मागील चार डावांतील त्याचे हे तिसरे शतक ठरले. या सामन्यात विराट कोहलीसोबत त्याचा वाद झाला अन् त्यानंतर बेअरस्टोने गिअर बदलला. ६३ चेंडूंत केवळ १३ धावा करणाऱ्या बेअरस्टोने पुढे ११९ चेंडूंत १०० पूर्ण केले. म्हणजे त्याने ८७ धावा या ५६ चेंडूंत चोपून काढल्या. बेअरस्टोने कसोटीतील पाचवे शतक झळकावताना इंग्लंडवरील फॉलोऑनची नामुष्कीही दूर केली.
जॉनी बेअरस्टो व बेन स्टोक्स यांनी सहाव्या विकेटसाठी ७५ चेंडूंत ६६ धावांची भागीदारी केली. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सला दोन जीवदान मिळाले. शार्दूल ठाकूर व जसप्रीत बुमराह यांनी सोपे झेल सोडले. पण, शार्दूलने त्याच्या पहिल्याच षटकात बेन स्टोक्सची विकेट घेतली. जसप्रीत बुमराहने अशक्यप्राय वाटणारा झेल टिपला. बेन स्टोक्स २५ धावांवर माघारी परतला. त्यानंतर बेअरस्टो व सॅम बिलिंग्स यांनी ४९ चेंडूंत ५१ धावांची भागीदारी केली.
पावसाने पुन्हा एकदा खोडा घातल्याने लंच ब्रेक आधीच घ्यावा लागला. सायंकाळी ६ वाजता दिवसाचे दुसरे सत्र सुरू झाले तेव्हा बिलिंग्सने चौकाराने सुरुवात केली. २०२२मध्ये कसोटीत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांत बेअरस्टोने ८६५* धावांसह अव्वल स्थान पटकावले आहे. त्याने उस्मान ख्वाजा ( ८२२) व जो रूट ( ७५४) यांना मागे टाकले.