Ind Vs Eng test Match live : रिषभ पंत ( १४६) व रवींद्र जडेजा ( १०४) यांच्या शतकांपेक्षा शनिवारी चर्चा रंगली ती जसप्रीत बुमराहच्या ( Jasprit Bumrah) फलंदाजीची... त्याने स्टुअर्ट ब्रॉडच्या एका षटकात २९ धावा चोपून कसोटी क्रिकेटमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला. १६ चेंडूंत नाबाद ३१ धावा करून त्याने भारताला ४१६ धावांपर्यंत पोहोचवले. त्यानंतर पाचव्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी ३ धक्के देत इंग्लंडला बॅकफूटवर फेकले. या कामगिरीसह त्याने आणखी एक विक्रमाची नोंद करताना महान कर्णधार कपिल देव ( Kapil Dev) यांना मागे टाकले.
५ बाद ८४ धावांवरून तिसऱ्या दिवसाची सुरुवात करणाऱ्या इंग्लंडने दमदार फटकेबाजी केली. जॉनी बेअरस्टो व बेन स्टोक्स यांनी सहाव्या विकेटसाठी ७५ चेंडूंत ६६ धावांची भागीदारी केली. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सला दोन जीवदान मिळाले. शार्दूल ठाकूर व जसप्रीत बुमराह यांनी सोपे झेल सोडले. पण, शार्दूलने त्याच्या पहिल्याच षटकात बेन स्टोक्सची विकेट घेतली. जसप्रीत बुमराहने अशक्यप्राय वाटणारा झेल टिपला. बेन स्टोक्स २५ धावांवर माघारी परतला आणि त्याची व बेअरस्टोची ७५ चेंडूंतील ६६ धावांची भागीदारी संपुष्टात आली. त्यानंतर बेअरस्टो व सॅम बिलिंग्स यांनी ४९ चेंडूंत ५१ धावांची भागीदारी केली.
टीम इंडियाच्या पहिल्या डावातील ४१६ धावांचा पाठलाग करताना दुसऱ्या दिवसअखेर इंग्लंडचा निम्मा संघ ८४ धावांवर माघारी परतला होता. अॅलेक्स लीज ( ६), झॅक क्रॅवली ( ९) व ऑली पोप ( १०) यांना बुमराहने बाद केले. त्यानंतर मोहम्मद सिराजने महत्त्वाची विकेट घेताना जो रूटला ६७ चेंडूंत ३१ धावांवर बाद केले. मोहम्मद शमीने नाईट वॉचमन जॅक लिचला ( ०) माघारी पाठवले. बुमराहने या तीन विकेट्स घेत भारताकडून पहिल्या ३० कसोटींत १२६ विकेट्सचा विक्रम नावावर केला. कपिल देव १२४ विकेट्सह अव्वल स्थानावर होते. कपिल देव यांच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये ४३४ विकेट्स व ५२४८ धावा आहेत. १९८३ साली त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने पहिला वर्ल्ड कप जिंकला.
Web Title: Ind vs Eng 5th Test Match Live scorecard : Jasprit Bumrah has taken the most wickets in the first 30 matches for India in Test history among fast bowlers
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.