Join us  

Joe Root Century, Ind vs Eng Live test Match : जो रूटचे आणखी एक शतक, विराट कोहलीला मागे टाकले; जॉनी बेअरस्टोसह २०० धावा करून केला विक्रम 

Ind Vs Eng test Match live : जो रूट आणि जॉनी बेअरस्टो या अनुभवी व फॉर्मात असलेल्या जोडीने भारताच्या हातून सामना खेचून नेला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2022 3:54 PM

Open in App

Ind Vs Eng test Match live : जो रूट आणि जॉनी बेअरस्टो या अनुभवी व फॉर्मात असलेल्या जोडीने भारताच्या हातून सामना खेचून नेला आहे. सेट झालेले हे दोन्ही फलंदाज सहजतेने धावा करत होते. पाचव्या दिवसाच्या पहिल्या सत्रातही भारतीय गोलंदाजांकडून काही खास स्ट्रॅटेजी आखलेली दिसली नाही आणि त्यामुळे सामना हातातून निसटताना दिसतोय. इंग्लंडच्या या मातब्बर फलंदाजांनी चौथ्या विकेटसाठी द्विशतकी भागीदारी केली. रूटने कसोटीतील २८ वे शतक पूर्ण करताना मोठी कामगिरी केली.

कसोटी वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची भारताला अजूनही संधी; इंग्लंड कसोटीवर गणित अवलंबून

भारताच्या पहिल्या डावातील ४१६ धावांच्या प्रत्युत्तरात इंग्लंडचा पहिला डाव २८४ धावांवर गडगडला. मोहम्मद सिराजने चार विकेट्स घेतल्या. १३२ धावांची आघाडी मिळवूनही भारताला दुसऱ्या डावात साजेशी कामगिरी करता आली नाही. चेतेश्वर पुजारा ( ६६) व रिषभ पंत ( ५७) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने २४५ धावांपर्यंत मजल मारली आणि इंग्लंडसमोर ३७८ धावांचे लक्ष्य ठेवण्यात ते यशस्वी झाले. एडबस्टन कसोटीत आतापर्यंत २८४ धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करता आला आहे. पण, इंग्लंडची सद्यस्थिती पाहता हा विक्रम मोडला जाण्याची चिन्हे आहेत.  

भारताच्या ३७८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना जॅक क्रॅवली ( ४६) व अॅलेक्स लीज ( ५६)  यांनी पहिल्या विकेटसाठी १०७ धावा जोडल्या अन् मजबूत पाया रचला. त्यानंतर भारताने २ धावांच्या अंतराने तीन विकेट्स घेत कमबॅक केले. इथून भारताला सामन्यावर पकड मजबूत करण्याची संधी होती, परंतु बेअरस्टोला १४ धावांवर दिलेले जीवदान महागात पडले. बेअरस्टो व रूट या अनुभवी खेळाडूंनी चौथ्या दिवसाचे अखेरचे संपूर्ण सत्र खेळून काढताना ३ बाद १०९ वरून इंग्लंडला सावरले. रूटने भारताविरुद्ध कसोटीमध्ये इंग्लंडकडून सर्वाधिक २४३१ धावांचा अॅलिस्टर कूकला विक्रम मोडला.  रूट व बेअरस्टो यांची विकेट मिळवण्यासाठी भारताने दोन DRS ही वाया घालवले. 

जो रूट व जॉनी बेअरस्टो यांनी २०० धावांची भागीदारी करून एका विक्रमाला गवसणी घातली. आर्टन आणि गूच यांनी १९९१ मध्ये चौथ्या डावात इंग्लंडसाठी द्विशतकी भागीदारी केली होती आणि त्यानंतर आज हा पराक्रम झाला. कसोटी क्रिकेटमध्ये रुटने २८ वे शतक झळकावून स्टीव्ह स्मिथ व विराट कोहली यांना ( २७ शतकं) मागे टाकले. जानेवारी २०२१नंतर रुटचे हे ११ वे कसोटी शतक ठरले. 

 

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडजो रूटविराट कोहली
Open in App