Ind Vs Eng test Match live : इंग्लंडने २००७नंतर प्रथमच कसोटी मालिका जिंकण्याचे भारताचे स्वप्न अधुरे राहिले. मालिकेत २-१ अशा आघाडीमुळे पाचव्या कसोटीत भारताला ड्रॉ हा निकालही पुरेसा होता. ३७८ धावांचे लक्ष्य समोर असूनही इंग्लंडच्या फलंदाजांनी दमदार खेळ केला. जो रूट ( Joe Root) व जॉनी बेअरस्टो ( Jonny Bairstow) यांचे विशेष कौतुक. दोघांनी वैयक्तिक शतक झळकावून इंग्लंडला ७ विकेट्स राखून विजय मिळवून देताना मालिका २-२ अशी बरोबरीत सोडवली. दुसऱ्या डावातील फलंदाजांचे अपयश हे भारताला मारक ठरले, अशी प्रांजळ कबुली कॅप्टन जसप्रीत बुमराहने दिली.
इंग्लंडने मोडले १२ मोठे विक्रम, भारताच्या नावावर नकोसा पराक्रम; विराट कोहलीने लपवले तोंड
भारताच्या पहिल्या डावातील ४१६ धावांच्या प्रत्युत्तरात इंग्लंडचा पहिला डाव २८४ धावांवर गडगडला. १३२ धावांची आघाडी मिळवूनही भारताला दुसऱ्या डावात साजेशी कामगिरी करता आली नाही. विशेषतः विराट कोहली, शुबमन गिल, हनुमा विहारी व श्रेयस अय्यर हे दोन्ही डावांत अपयशी ठरले. चेतेश्वर पुजारा ( ६६) व रिषभ पंत ( ५७) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने २४५ धावांपर्यंत मजल मारली आणि इंग्लंडसमोर ३७८ धावांचे लक्ष्य ठेवण्यात ते यशस्वी झाले.
भारताच्या ३७८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना जॅक क्रॅवली ( ४६) व अॅलेक्स लीज ( ५६) यांनी पहिल्या विकेटसाठी १०७ धावा जोडल्या अन् मजबूत पाया रचला. त्यानंतर भारताने २ धावांच्या अंतराने तीन विकेट्स घेत कमबॅक केले. पण, जो रूट ( १४२*) व जॉनी बेअरस्टो ( ११४*) यांनी सर्व गणित बिघडवले. त्यांनी भारतीय गोलंदाजांचा पालापाचोळा केला. या दोघांनी ३१६ चेंडूंत २६९ धावांची नाबाद भागीदारी करताना ऐतिहासिक विजय मिळवून दिला.
या पराभवानंतर टीम इंडियाचा कर्णधार जससप्रीत बुमराह म्हणाला, ''जर आणि पण ही गोष्ट नेहमीच असू शकते, परंतु क्रिकेटचा खेळ असाच चालतो, इंग्लंडने दुसऱ्या डावात आपल्यापेक्षा चांगला खेळ केला. दोन्ही संघ चांगले क्रिकेट खेळले. रिषभने संधी साधली, त्याने आणि जड्डूने पलटवार केला आणि आम्ही सामन्यात पुढे होतो. रिषभसाठी खूप आनंदी आहे. कर्णधारपद हे एक चांगलं आव्हान होतं, खूप काही शिकायला मिळालं, संघाचं नेतृत्व करण्याचा सन्मान आणि माझ्यासाठी एक उत्तम अनुभव होता.''
''काल आम्ही फलंदाजीत सपशेल अपयशी ठरलो आणि तेथेच इंग्लंडला सामन्यात कमबॅक करण्याची संधी मिळाली. आम्ही हातातून सामना गमावला. या मालिकेत अजून मागे गेल्यास पहिल्या कसोटीत पाऊस पडला नसता तर ती मॅच आम्ही जिंकलो असतो,''असेही तो म्हणाला.