India vs England 5th Test : कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma) याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने टीम इंडियाची धाकधुक वाढली आहे. भारत-इंग्लंड यांच्यात १ जुलैपासून पाचवी कसोटी लढत सुरू होणार आहे. इंग्लंडचा संघ बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखाली फॉर्मात आलेला दिसतोय... जो रूटने कर्णधारपदावरून हटण्याचा निर्णय घेतला आणि बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखाली पहिल्याच मालिकेत इंग्लंड ३-० अशा फरकाने न्यूझीलंडला पराभूत करण्याच्या मार्गावर आहे. अशात रोहितचे संघात नसणे टीम इंडियाचे टेंशन वाढवणारे आहे. त्यामुळेच BCCI ने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
लिसेस्टरशायर क्लबविरुद्धच्या सराव सामन्याच्या तिसऱ्या दिवशी रोहित फलंदाजीला आलाच नाही. त्यानंतर सायंकाळी बीसीसीआयने ट्विट करून सांगितले की, रोहितचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. २५ जूनला रोहितची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली, त्यानंतर रोहित आता पाच दिवस विलगिकरणार राहणार आहे. ३० जूनला त्याची दोन वेळा RT-PCR चाचणी करण्यात येईल आणि ती निगेटिव्ह आल्यानंतरच त्याला खेळता येईल. भारताच्या अन्य खेळाडूंचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे आणि ते मंगळवारी बर्मिंगहॅमसाठी रवाना होतील.
रोहितच्या जागी कसोटीसाठी बॅक-अप म्हणून मयांक अग्रवालला बोलावण्याचा निर्णय घेतला. लोकेश राहुल दुखापतग्रस्त झाल्यानंतर मयांकला बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत स्टँड बाय म्हणून राहण्यास सांगितले होते आणि आता तेथून तो लंडनसाठी रवाना झाला आहे. रोहित शर्मा वेळेत तंदुरुस्त न झाल्यास शुबमन गिलसह सलामीसाठी तीन पर्याय सध्या संघात आहेत. केएस भरत, हनुमा विहारी आणि चेतेश्वर पुजारा यापैकी एक गिलसह पाचव्या कसोटीत ओपनिंगला येऊ शकतो. मयांकला बॅक अप म्हणून बोलावले गेले आहे.