Join us  

Ravindra Jadeja, IND vs ENG 5th Test : 5 बाद 98 वरून टीम इंडियाने 400 पार मजल मारली; रिषभ पंत, रवींद्र जडेजाच्या शतकी खेळीने लाज वाचवली

India vs England 5th Test : रिषभ पंतच्या साथीने टीम इंडियाचा गडगडलेला डाव सावरणाऱ्या रवींद्र जडेजाने ( Ravindra Jadeja) इंग्लंडविरुद्धच्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी शतक पूर्ण केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2022 4:07 PM

Open in App

India vs England 5th Test : रिषभ पंतच्या साथीने टीम इंडियाचा गडगडलेला डाव सावरणाऱ्या रवींद्र जडेजाने ( Ravindra Jadeja) इंग्लंडविरुद्धच्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी शतक पूर्ण केले. मोहम्मद शमीनेही सुरेख फटके मारताना त्याला  चांगली साथ दिली. 92 धावांवर असताना जडेजाचा दुसऱ्या स्लिपमध्ये झेल सुटला अन् तो चेंडू चौकार गेला. त्यानंतर आणखी एक चौकार मारून त्याने शतक पूर्ण केले. त्याचे हे कसोटीतील तिसरे शतक अन् इंग्लंडविरुद्धचे पहिलेच शतक ठरले. जसप्रीत बुमराहने ( jasprit bumrah) अखेरच्या विकेटसाठी दमदार फटकेबाजी करताना भारताची धावसंख्या 400+ पार नेली.  पहिल्या दिवशी भारताची अवस्था 5 बाद 98 अशी झाली होती. त्यानंतर रिषभ व जडेजा यांनी सहाव्या विकेटसाठी विक्रमी 222 धावांची भागीदारी केली. रिषभने 111 चेंडूंत 19 चौकार व 4 षटकारांच्या मदतीने 146 धावा केल्या. रिषभ पंतने 89 चेंडूंत हे शतक पूर्ण केले. इंग्लंडमध्ये भारताकडून हे दुसरे जलद शतक ठरले. यापूर्वी 1990मध्ये मोहम्मद अझरुद्दीनने लॉर्ड्स कसोटीत 87 चेंडूंत शतक झळकावले होते. रिषभने 111 चेंडूंत 146 धावा केल्या आणि त्याचा स्ट्राईक रेट हा 131.53 इतका होता. स्ट्राईक रेटनुसार भारताकडून ही दुसरी जलद सेंच्युरी ठरली. 1996मध्ये कोलकाता कसोटीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अझरुद्दीनने 141.55च्या स्ट्राईक रेटने 77 चेंडूंत 109 धावा केल्या होत्या.  

दुसऱ्या दिवशी जडेजा व मोहम्मद शमी यांनी दमदार खेळ करताना सुरेख फटके मारले. 70 चेंडूंत 48 धावांची ही भागीदारी स्टुअर्ट ब्रॉडने संपुष्टात आणली. शमी ( 16) ची विकेट घेत ब्रॉडने कसोटीत 550 वा बळी टिपला.  त्यानंतर जडेजाची विकेट पडली. जेम्स अँडरसनने भन्नाट यॉर्कर टाकून ही विकेट मिळवली. जडेजा 194 चेंडूंत 13 चौकारांसह 104 धावांवर बाद झाला.  1997 साली केप टाऊन कसोटीत सचिन तेंडुलकर ( 169) व  मोहम्मद अझरुद्दीन ( 115) यांनी पाचव्या व सातव्या क्रमांकावर येताना शतक झळकावले होते. त्यानंतर 2022मध्ये रिषभ पंत ( 146) व रवींद्र जडेजा ( 104) यांनी हा पराक्रम केला. एकूण भारताकडून पाचवेळा अशी कामगिरी झाली.

भारताचा पहिला डाव 416 धावांवर संपुष्टात आला. जसप्रीत बुमराहने 16 चेंडूंत 4 चौकार व 2 षटकारांसह नाबाद 31 धावा केल्या. जेम्स अँडरसनने 60 धावा देताना 5 विकेट्स घेतल्या.  

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडरवींद्र जडेजारिषभ पंतजसप्रित बुमराह
Open in App