Rahul Dravid, IND vs ENG 5th Test : इंग्लंडविरुद्धच्या लाजीरवाण्या पराभवानंतर टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड याने भारतीय संघाची थिंक टँक यावर बसून चर्चा करेल आणि पराभवामागचं परीक्षण करतील, असे मत मांडले. जो रूट व जॉनी बेअरस्टो यांनी २६९ धावांची नाबाद भागीदारी करताना इंग्लंडला ७ विकेट्स राखून विजय मिळवून दिला. बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखाली आक्रमक खेळ करणाऱ्या इंग्लंडने ३७८ धावांचे लक्ष्य सहज पार केले आणि मालिका २-२ अशी बरोबरीत सोडवली.
भारताने कसोटी वर्ल्ड कप आता विसरावा, बसला आणखी एक धक्का; ICC कडून कारवाई, पाकिस्तानचा फायदा!
जॅक क्रॅवली ( ४६) व अॅलेक्स लीज ( ५६) यांनी पहिल्या विकेटसाठी १०७ धावा जोडल्या अन् मजबूत पाया रचला. त्यानंतर भारताने २ धावांच्या अंतराने तीन विकेट्स घेत कमबॅक केले. पण, जो रूट ( १४२*) व जॉनी बेअरस्टो ( ११४*) यांनी सर्व गणित बिघडवले. त्यांनी भारतीय गोलंदाजांचा पालापाचोळा केला. या दोघांनी ३१६ चेंडूंत २६९ धावांची नाबाद भागीदारी करताना ऐतिहासिक विजय मिळवून दिला. या विजयासोबत इंग्लंडने कसोटी मालिका २-२ अशी बरोबरीत सोडवली.
या पराभवानंतर टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड पत्रकार परिषदेत आला आणि तो म्हणाला,''आम्ही इतकं क्रिकेट खेळतोय की विचार करायला वेळच मिळत नाही. आज मी तुमच्यासमोर क्रिकेटच्या वेगळ्या फॉरमटवर चर्चा करतोय आणि दोन दिवसांनंतर परिस्थिती वेगळीच असेल. पण या कामगिरीवर आम्ही नक्कीच विचार करू. प्रत्येक सामना हा आमच्यासाठी धडा असतो आणि तुमचा कल काहीतरी शिकण्याकडे असायला हवा. आम्ही कसोटी सामन्याच्या तिसऱ्या डावात चांगली फलंदाजी का करू शकलो नाही आणि चौथ्या डावात १० विकेट का काढू शकलो नाही याचा विचार करणे गरजेचे आहे.''
या कसोटीनंतर ७ जुलैपासून भारतीय संघ तीन ट्वेंटी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय संघ आता बांगलादेश दौऱ्यावर दोन कसोटी व मायदेशात ऑस्ट्रेलियाविरुद्ध चार कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. ''आता पुढील सहा कसोटी सामने हे आशिया उपखंडात आहेत आणि या सर्व मॅच जिंकण्याचे आमचे लक्ष्य आहे. पण, इंग्लंडविरुद्धच्या पराभवाचे परिक्षण व्हायला हवं. त्याने पुढील सामन्यांत चुका टाळण्यास मदत होईल आणि जेव्हा SENA देशांविरुद्ध खेळू, तेव्हा त्याचा फायदा होईल,''असेही द्रविड म्हणाला.
भारताचे आगामी वेळापत्रक
- इंग्लंड दौरा - जुलै ( ३ ट्वेंटी-२० व ३ वन डे)
- वेस्ट इंडिज दौरा - जुलै/ऑगस्ट ( ३ वन डे व ५ ट्वेंटी-२०)
- श्रीलंका दौरा - ऑगस्ट ( २ ट्वेंटी-२०)
- आशिया चषक २०२२ - ऑगस्ट/सप्टेंबर
- भारत वि. ऑस्ट्रेलिया - सप्टेंबर ( ३ ट्वेंटी-२०)
- ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२ - ऑक्टोबर/नोव्हेंबर