विशाखापट्टणम : ज्या फिरकीपटूंना इंग्लंड संघात निवडले आहे, ते भारतीय संघाला पराभूत करण्याची क्षमता ठेवतात. तसेच मालिका विजयाची दुर्मीळ संधीही माझ्या संघातील हे गोलंदाज निर्माण करू शकतात, असे मत इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने व्यक्त केले आहे. हैदराबादला झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात पदार्पण करणाऱ्या टॉम हार्टलेने दुसऱ्या डावात तब्बल ७ बळी घेऊन इंग्लंडच्या विजयात महत्त्वपूर्ण भूमिका वठवली होती. मार्क वूड या केवळ एका वेगवान गोलंदाजाला घेऊन इंग्लंडचा संघ पहिल्या कसोटीत भारताविरुद्ध मैदानात उतरला होता. एका संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत स्टोक्स म्हणाला, कधी कधी अनुभव नसण्याचा उगाच जास्त बाऊ केला जातो.
अनुभवी असण्याचा निश्चितच फायदा होतो; पण अननुभवी खेळाडू अधिक निडरपणे खेळत असतात. भारताच्या दौऱ्याआधीही आम्ही त्याच फिरकीपटूंना संघात घ्यायचे ठरवले, जे मालिका विजयाची संधी निर्माण करू शकतात. हे केवळ फिरकीपटूंसाठी नाही तर त्या प्रत्येक खेळाडूसाठी आहे, जो प्रतिभाशाली आहे आणि भारतात येऊन दिलखुलासपणे खेळू शकतो.
परिणामांची चिंता सोडून खेळा...दौऱ्याआधीच मी संघातील प्रत्येक खेळाडूला सांगितले होते की, कुठलेही दडपण घेऊन मैदानावर जाऊ नका. नैसर्गिकपणे खेळलो तर परिणाम काय होतील याची चिंता करू नका. पराभूत झालो तर जबाबदारी मी घ्यायला तयार आहे. फक्त तुम्ही मुक्तपणे खेळा, असा सल्ला खेळाडूंना दिल्याचे स्टोक्सने सांगितले. कुठल्याही विदेशी संघासाठी भारताला भारतात पराभूत करणे हे एखाद्या मिशनसारखेच असते. त्यामुळे २०१२ सालाप्रमाणे मालिका जिंकण्यात यशस्वी ठरलो, तर ती स्वप्नपूर्तीच असेल, असेही बेन स्टोक्स म्हणाला.