अहमदाबाद - अहमदाबादमध्ये झालेली दिवस-रात्र कसोटी जिंकून भारताने इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. आता पुढील आठवड्यात सुरू होणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. मात्र या सामन्यापूर्वी भारताला मोठा धक्का बसला आहे. भारतीय संघातील अव्वल गोलंदाजाने वैयक्तिक कारणांमुळे चौथ्या सामन्यातून माघार घेतली आहे. त्यामुळे आता चौथ्या कसोटीसाठी भारताला नव्याने संघबांधणी करावी लागणार आहे.
भारताचा आघाडीचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यातून माघार घेतली आहे. काही वैयक्तिक कारणास्तव बुमराहने या सामन्यामधून माघार घेतली आहे. त्यासाठी त्याने बीसीसीआयला विनंती केली आहे. दरम्यान, बुमराहच्या जागी भारतीय संघात नव्या खेळाडूचा समावेस करण्यात आलेला नाही. आता चौथ्या कसोटी सामन्यासाठी जसप्रित बुमराहच्या जागी इशांत शर्मा किंवा मोहम्मद सिराज यांच्यापैकी एकाला संघात स्थान मिळू शकते.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर ४ ते ८ मार्चदरम्यान खेळवण्यात येणार आहे. या मालिकेत भारतीय संघ सध्या २-१ ने आघाडीवर आहे. दरम्यान, आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात खेळण्यासाठी भारतीय संघाला हा कसोटी सामना किमान अनिर्णित राखणे गरजेचे आहे.
चौथ्या कसोटीसाठी भारतीय संघविराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), रोहित शर्मा, मयांक अग्रवाल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, केएल राहुल, हार्दिक पांड्या, रिषभ पंत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, इशांत शर्मा, मोहम्मद सिराज आणि उमेश यादव.
चौथ्या कसोटीसाठी इंग्लंडचा संघजो रूट (कर्णधार), जेम्स अँडरसन, जोफ्रा आर्चर, जॉनी बेअरस्टो, डोमिनिक बेस, स्टुअर्ट ब्रॉड, रॉरी बर्न्स, जेक क्रॉली, बेन फोक्स, डेन लॉरेन्स, जॅक लिच, ओली पोप, डॉम सिब्ली, बेन स्टोक्स, ऑली स्टोन आणि मार्क वूड