भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने आज 'फ्लॉप शो'वर फूल स्टॉप लावला. तो पुन्हा फॉर्मात परतला आहे. 'हिटमॅन' म्हणून प्रसिद्ध असलेल्या रोहितने रविवारी भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात धडाकेबाज शतक ठोकले. सलामीवीर म्हणून मैदानात आल्यानंतर त्याने केवळ ७६ चेंडूत ९ चौकार आणि ७ षटकारांसह शतक साजरे केले. महत्वाचे म्हणजे, त्याने षटकार टोकत आपले शतक साजरे केले. हे त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील ३२ वे शतक आहे. या खेळीत रोहितने अनेक विक्रम केले. त्याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड यांचाही विक्रम मोडला आहे.
खरे तर, रोहित हा एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वात कमी डावांमध्ये ३२ शतके ठोकणारा दुसरा फलंदाज बनला आहे. रोहितने २५९ एकदिवसीय डावांमध्ये हा आकडा गाठला. सचिनने २८३ डावांमध्ये ३२ एकदिवसीय शतके केली होती. तर विराट कोहलीने हा पराक्रम १९४ डावांमध्ये केला होता. याशिवाय, ३७ वर्षीय रोहित एकदिवसीय सामन्यात सलामीवीर फलंदाज म्हणून दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाजही बनला आहे. त्याने आतापर्यंत १५,३५० हून अधिक धावा केल्या आहेत. त्याने सचिनला मागे टाकले, सचिनने एकदिवसीय सलामीवीर म्हणून १५३३५ धावा केल्या होत्या. या यादित माजी स्फोटक सलामीवीर वीरेंद्र सेहवाग पहिल्या स्थानावर आहे. त्याने १६११९ धावा फटकावल्या आहेत.
रोहितने वयाच्या 30 व्या वर्षानंतर भारतासाठी सर्वाधिक शतके करण्याच्या बाबतीत सचिनला मागे टाकले आहे. त्याने ३६ शतके ठोकली आहेत. सिचनने वयाच्या 30 व्या वर्षानंतर 35 शतके ठोकली. याशिवाय, रोहितने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या टॉप-१० खेळाडूंच्या यादीतही प्रवेश केला आहे. त्याने द्रविडला ११ व्या स्थानावर ढकलले. 'हिटमॅन'ने २६७ एकदिवसीय सामन्यांमध्ये ११००० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. याच वेळी, द्रविडने ३४४ एकदिवसीय सामन्यांमध्ये १०८८९ धावा केल्या. यादीत सर्वात वर सचिन आहे, ज्याने १८४२६ एकदिवसीय धावा केल्या आहेत. श्रीलंकेचा माजी यष्टीरक्षक कुमार संगकारा (१४२३४) दुसऱ्या तर विराट कोहली (१३९११) तिसऱ्या स्थानावर आहे.
षटकारांच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर -सध्या एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक षटकार ठोकण्याचा विक्रम माजी पाकिस्तानी क्रिकेटर शाहिद आफ्रिदीच्या नावावर आहे. त्याने ३९८ एकदिवसीय सामन्यांमध्ये ३५१ षटकार ठोकले आहेत. आता रोहित या यादीत दुसऱ्या स्थानावर आला आहे. इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात त्याने आपल्या खात्यात 338 षटकारांची नोंद केली. गेलने ३०१ सामन्यांमध्ये ३३१ षटकार ठोकले आहेत. महेंद्रसिंग धोनी यादीत पाचव्या स्थानावर आहे. त्याने ३५० एकदिवसीय सामन्यांमध्ये २२९ षटकार ठोकले आहेत.