India vs England, T20 Series : भारतीय संघाचा धडाकेबाज अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या (Hardik Pandya) इंग्लंडची झोप उडवण्यासाठी सज्ज झाला आहे. मर्यादित षटकांचा बादशहा समजला जाणाऱ्या हार्दिकनं इंग्लंडविरुद्धच्या आगामी टी-२० मालिकेसाठी सराव करतानाचा एक जबरदस्त व्हिडिओ शेअर केला आहे. (Ind vs Eng Hardik Pandya set to ready for T20 Series)
पाठीच्या दुखापतीमुळं जवळपास दीड वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर राहिल्यानंतर हार्दिकचं संघात पुनरागमन झालं होतं. पण दुखापतीमुळे गोलंदाजी करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. दुखापतीवर पूर्णपणे मात करुन आता पंड्या सज्ज झालेला दिसतोय.
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हार्दिक नेट्समध्ये खणखणीत फटके लगावताना दिसला. यावेळी फलंदाजीसोबतच त्यानं गोलंदाजीचाही सराव केला. त्यामुळे हार्दिक पंड्या नावाचं वादळ आता अहमदाबादमध्ये घोंगावताना दिसेल अशी आशा क्रिकेट चाहते व्यक्त करत आहेत.
"माझी तयारी पूर्ण झालीय आता १२ मार्चला स्टेडियमवर उतरण्याची वाट पाहातोय", असं कॅप्शन देत हार्दिकनं क्रिकेट सरावाचा व्हिडिओ पोस्ट केला आहे.
भारतीय टी-२० संघाचा हार्दिक पंड्या एक हुकमी एक्का आहे. कमीत कमी चेंडूत जास्त धावा करणं आणि त्यासोबतच गोलंदाजी देखील करणं यासाठी हार्दिक पंड्या टी-२० साठी अतिशय उपयुक्त खेळाडू आहे. पंड्याच्या पुनरागमनामुळे भारतीय क्रिकेट चाहते देखील खूष झाले आहेत. टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या दृष्टीनं भारतीय संघासाठी ही अतिशय आनंदाची गोष्ट मानली जात आहे.