नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर रंगलेल्या टी-२० विश्वचषकातून भारतीय संघ बाहेर झाला आहे. इंग्लंडविरूद्धच्या पराभवानंतर भारताचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. ४ साखळी सामने जिंकून भारतीय संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. मात्र उपांत्य फेरीत आज इंग्लिश संघाने भारताचा १० गडी राखून मोठा पराभव केला. भारताने दिलेल्या १६९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग इंग्लिश संघाने केवळ १६ षटकांत पूर्ण केला. या विजयासह इंग्लिश संघाने अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे. फायनलचा सामना १३ तारखेला पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात होणार आहे. भारतीय संघाचा लाजिरवाणा पराभव झाल्यानंतर पाकिस्तानचे माजी खेळाडू रोहित सेनेची खिल्ली उडवत आहेत.
इंग्लंडने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. प्रथम फलंदाजी करताना भारताची सुरूवात निराशाजनक झाली होती. सलामीवीर लोकेश राहुल दुसऱ्याच षटकातील चौथ्या चेंडूवर स्वस्तात माघारी परतला. कर्णधार रोहित शर्मा देखील २८ चेंडूत २७ धावांची सावध खेळी करून तंबूत परतला. त्यानंतर संघाची धुरा विराट कोहलीने सांभाळली आणि शानदार अर्धशतकी खेळी केली. भारताकडून किंग कोहली आणि हार्दिक पांड्या व्यतिरिक्त कोणत्याच फलंदाजाला साजेशी खेळी करता आली नाही. विराट कोहली ४० चेंडूत ५० धावांची खेळी करून बाद झाला. तर सूर्याला केवळ १० धावा करता आल्या. मात्र त्यानंतर हार्दिक पांड्याने ३३ चेंडूत ६३ धावांची ताबडतोब खेळी केली. पांड्याने ४ चौकार आणि ५ चौकारांच्या जोरावर इंग्लंडसमोर १६९ धावांचे सन्मानजनक आव्हान ठेवले. मात्र भारतीय गोलंदाजांना अपयश आले आणि इंग्लिश संघाने १० गडी राखून मोठा विजय मिळवून फायनलचे तिकिट मिळवले.
शाहिद आफ्रिदीने उडवली खिल्ली पाकिस्तानी संघाचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने इंग्लंडच्या खेळीचे कौतुक करताना भारतीय संघावर निशाणा साधला आहे. "इंग्लंडची किती अविश्वसनीय कामगिरी आहे. उपांत्य फेरीचे रूपांतर एका सामान्य सामन्यामध्ये झाले. जबरदस्त फलंदाजी ज्याला भारतीय संघाकडे कोणतेच उत्तर नव्हते. शानदार फलंदाजी @AlexHales1 @josbuttler", अशा शब्दांत आफ्रिदीने इंग्लंडच्या सलामीवीरांचे कौतुक केले आहे. याशिवाय आम्ही पाकिस्तान विरूद्ध इंग्लंड या सामन्यासाठी मेलबर्नच्या दिशेने निघालो असल्याचेही आफ्रिदीने म्हटले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"