Virat Kohli, Team India Squad, IND vs ENG Test: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) इंग्लंड विरुद्धच्या ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटच्या ३ सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा केली. सध्या पहिल्या दोन सामन्यांनंतर ही मालिका १-१ अशी बरोबरीत आहे. आज भारताने १७ सदस्यीय संघाची घोषणा केली. इंग्लंड विरूद्धच्या मालिकेतील शेवटच्या तीन सामन्यांसाठी आज भारतीय संघाची घोषणा झाली. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे विराट कोहली उर्वरित तीन सामन्यांसाठीही उपलब्ध नाही. वैयक्तिक कारणांमुळे विराट कोहली उर्वरित सामन्यांसाठी निवडीसाठी उपलब्ध नसल्याचे BCCI ने म्हटले आहे. तसेच आवेश खानला संघातून काढण्यात आले असून त्याजागी आकाश दीपची संघात निवड करण्यात आली आहे.
शेवटच्या तीन कसोटी सामन्यांसाठी भारतात संघ- रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, केएल राहुल, रजत पाटीदार, सर्फराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, आकाश दीप
जाडेजा, राहुल संघात पण...
रवींद्र जाडेजा आणि केएल राहुल यांचे संघात पुनरागमन झाले आहे. परंतु वैद्यकीय संघाकडून फिटनेसबाबत मंजुरीनंतरच त्यांचा संघात सहभाग शक्य होईल. म्हणजेच जाडेजा आणि राहुल संघात परतले असले तरी ते खेळतील याबाबत निश्चिती नाही. जाडेजा आणि राहुलला दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटी सामन्यातून बाहेर राहावे लागले होते.