मॅचेस्टर - भारत आणि इंग्लंड यांच्यात उद्यापासून सुरू होणाऱ्या पाचव्या कसोटी सामन्यावर अनिश्चिततेचे सावट घोंघावत आहे. भारतीय संघाच्या सपोर्ट स्टाफमधील एका सदस्याचा कोरोना अहवाल आज पॉझिटिव्ह आल्याने पाचव्या कसोटी सामन्याबाबत अनिश्तितता निर्माण झाली आहे. (India vs England 5th Test Update) दरम्यान, पाचवा कसोटी सामना रद्द झाल्यास मालिकेत २-१ अशा आघाडीवर असलेल्या भारतीय क्रिकेट संघाला मालिकेतील विजेता संघ घोषित केले जाणार का? असा प्रश्न क्रिकेटप्रेमींना पडला आहे. या प्रश्नाचं उत्तर आता समोर आलं आहे. (if Manchester Test is canceled, the Indian team will not be declared the winner despite leading the series)
इंग्लंड विरुद्ध सुरू असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाने सुरुवातीपासून जबरदस्त कामगिरी केली आहे. दरम्यान, ओव्हलवर झालेल्या चौथ्या कसोटी सामन्यात भारताने विजय मिळवून मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. मात्र आता मँचेस्टर कसोटी सामना रद्द झाला तर भारतीय संघाला मालिकेत आघाडीवर असूनही विजेता घोषित केले जाणार नाही. ही मालिका अपूर्ण राहिल्याचे समजले जाईल आणि मालिकेतील शेवटचा कसोटी सामना हा नंतर खेळवला जाईल.
यादरम्यान, मँचेस्टरमध्ये पाचवा कसोटी सामना खेळण्यासाठी बीसीसीआय इच्छुक नसल्याची अफवा सोशल मीडियावर उडाली होती. त्यामागे आयपीएल हे कारण असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र आता स्वत: बीसीसीआयकडून याचं खंडन करण्यात आलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मँचेस्टरमध्ये पाचवा कसोटी सामना खेळवला जावा, अशी बीसीसीआयची इच्छा आहे. कारण भारतीय संघ सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. लॉर्ड्स कसोटी जिंकल्यानंतर भारताने ओव्हलवरही ऐतिहासिक विजय मिळवला होता. ओव्हलवर भारताच्या फलंदाजांनी आणि गोलंदाजांनी चमक दाखवली होती. त्यामुळे इंग्लंडच्या संघावर दबाव आहे.
दरम्यान, मँचेस्टरमध्ये भारताचे रेकॉर्ड फार वाईट आहे. येथे भारतीय संघाला एकही सामना जिंकता आलेला नाही. भारतीय संघ येथे एकूण ९ कसोटी सामने खेळला आहे. त्यातील ४ कसोटी सामन्यात भारताचा पराभव झाला आहे. तर पाच सामने अनिर्णित राहिले आहेत. भारताने मँचेस्टरमधील मागचा कसोटी सामना एका डावाने गमावला होता.