भारतीय संघातील स्टार फिरकीपटू कुलदीप यादव याने सोशल मीडियाच्या माध्यमातून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तो नेट्समध्ये गोलंदाजी करताना दिसतोय. गेल्या काही दिवसांपासून तो दुखापतीमुळे क्रिकेटपासून दूर होता. इंग्लंड विरुद्धची घरच्या मैदानातील वनडे मालिका आणि चॅम्पियन्स ट्रॉफी आधी टीम इंडियासाठी हा एक चांगला संकेतच म्हणावा लागेल. लेग स्पिनर कुलदीप यादव ग्रोइन इंज्युरीमुळे बऱ्याच दिवसांपासून संघाबाहेर आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
टी-२० संघात मिळाली नाही संधी, पण...
भारतीय संघ इंग्लंड विरुद्धच्या टी-२० मालिकेनं नव्या वर्षातील मर्यादित षटकांच्या सामन्याला सुरुवात करणार आहे. पाच सामन्यांच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणाही झाली आहे. टी-२० संघात कुलदीप यादव संघाचा भाग नाही. पण इंग्लंड विरुद्धच्या वनडे सामन्यात त्याला संघात संधी मिळू शकते. एवढेच नाही तर तो चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठीही आपली दावेदारी ठोकू शकतो.
न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळला होता अखेरचा सामना
मागील वर्षी न्यूझीलंड विरुद्धच्या बंगळुरु कसोटी सामन्यात त्याला दुखापत झाली होती. पण आता तो या दुखापतीतून सावरून पुन्हा कमबॅकसाठी सज्ज झाल्याचे दिसून येते. लेग स्पिनर कुलदीप यादवनं ऑक्टोबर २०२४ मध्ये न्यूझीलंड विरुद्ध अखेरचा कसोटी सामना खेळला होता.
जर फिट असेल तर कमबॅक पक्के, अनफिट ठरला तर दोन पर्यायही उपलब्ध
कुलदीप यादव हा भारतीय संघातील मॅच विनर गोलंदाज आहे. चेंडूप्रमाणे सामना वळवण्याची ताकद त्याच्या गोलंदाजीत आहे. जर तो फिट असेल तर इंग्लंड विरुद्धच्या वनडे मालिकेसह चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या संघातून तो कमबॅक करताना पाहायला मिळू शकते. जर तो फिट नसेल तर त्याच्या जागी वरुण चक्रवर्ती किंवा रवि बिश्नोईला संधी मिळू शकते.