इंग्लंड विरुद्धच्या नागपूर वनडे सामन्यात भारतीय संघाने ४ विकेट्स राखून दमदार विजय नोंदवला. इंग्लंडच्या संघाने दिलेल्या २४९ धावांचा पाठलाग करताना शुबमन गिल, श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेल यांनी आपल्या बॅटिंगमधील धमक दाखवून दिली. तिघांनी इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या वनडे अर्धशतके झळकावली. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी आधी भारतीय संघाच्या मध्यफळीत 'अच्छे दिन' पाहायला मिळाले. या तिघांच्या कामगिरीमुळे तब्बल १५ वर्षांनी टीम इंडियाच्या मध्यफळीतील फलंदाजीत ताकद दिसून आली. या तिघांची दमदार खेळी जुन्या दिवसांच्या आठवणीला उजाळा देणारी आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
टीम इंडियाच्या ताफ्यातील तिघांची फिफ्टी
इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात श्रेयस अय्यरनं ३६ चेंडूत ९ चौकार आणि २ उत्तुंग षटकाराच्या मदतीने ५९ धावांची दमदार खेळी केली. अक्षर पटेलनं या सामन्यात ४७ चेंडूत ५२ धावा ठोकल्या. तर शुबमन गिलनं संयमी खेळीसह सामन्यातील ८७ ही वैयक्तिक सर्वोच्च धावसंख्या नोंदवली.
...अन् १५ वर्षांचा दुष्काळ संपला
अय्यर-गिल आणि अक्षर या तिघांनी अर्धशतकी खेळीसह १५ वर्षांपासून टीम इंडियात पडलेला दुष्काळ संपवला आहे. धावांचा पाठलाग करताना १५ वर्षांनंतर भारतीय ताफ्यातील तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर खेळणाऱ्या फलंदाजांनी ५० हून अधिक धावा काढल्याचे पाहायला मिळाले. याआधी २०१० मध्ये विराट कोहली, युवराज सिंग आणि सुरेश रैना या तिघांनी अशी कामगिरी केली होती.
मोहम्मद अझरुद्दिनच्या नावे खास रेकॉर्ड
सर्वात आधी अशी कामगिरी करण्याचा विक्रम हा संजय मांजरेकर, दिलीप वेंगसरकर आणि मोहम्मद अझरुद्दीन या त्रिकूटाच्या नावे आहे. १९९० मध्ये इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात त्यांनी ही कामगिरी केली होती. त्यानंतर संजय मांजरेकर, सचिन तेंडुलकर आणि मोहम्मद अझरुद्दिन यांनी १९९१ मध्ये पुन्हा एकदा अशा कामगिरीची नोंद केली होती. तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावरील फलंदांचा खास फिफ्टी प्लस रेकॉर्ड
- संजय मांजरेकर/दिलीप वेंगसरकर/अझरुद्दीन (१९९०) विरुद्ध इंग्लंड
- संजय मांजरेकर/सचिन तेंडुलकर/अझरुद्दीन (१९९१ इंग्लंड)
- विराट कोहली/युवराज सिंग/सुरेश रैना (२०१०) विरुद्ध ऑस्ट्रेलिया
- शुबमन गिल/श्रेयस अय्यर/अक्षर पटेल (२०२५) विरुद्ध इंग्लंड