भारतीय वनडे संघाचा कर्णधार रोहित शर्मानं कटकच्या मैदानात हिट शो दाखवून देत आपल्या वनडे कारकिर्दीतील ३२ वे शतक साजरे केले. कटकच्या मैदानातील कडक खेळीनंतर वनडे कॅप्टनसाठी भारतीय टी-२० संघाच्या कॅप्टननं खास शब्दांत आपली भावना व्यक्त केली आहे. रोहित शर्माच्या जबरदस्त खेळीच्या चर्चेत आता सूर्यकुमार यादवनं शेअर केलेली इन्स्टा स्टोरीची भर पडली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
रोहित शर्मासाठी सूर्यकुमार यादवची खास पोस्ट
चांगल्या लोकांसोबत नेहमी चांगलेच घडते, ... भगवान तुसी ग्रेट हो, या आशयाच्या मोजक्या शब्दांत भारतीय टी-२० संघाचा कॅप्टन सूर्यकुमार यादवनं वनडे संघाचा कॅप्टन रोहित शर्मावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. रोहित शर्मा हा मागील काही सामन्यात सातत्याने अपयशी ठरत होता. खराब कामगिरीनंतर त्याच्यावर चौहू बाजूंनी टीका होताना दिसली. पण आता तो लयीत परतला आहे. जुन्या रोहितची कडक खेळी सूर्यकुमार यादवलाही भावली आहे. रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यांच्यात कमालीचे बॉन्डिंग आहे. सूर्याच्या इन्स्टा पोस्टमधून ते पुन्हा एकदा दिसून आले.
रोहित निवृत्त झाला अन् सूर्यानं घेतली त्याची जागा
भारतीय संघाला टी-२० वर्ल्ड कप जिंकून दिल्यावर रोहित शर्मानं आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्याच्या जागी सूर्यकुमार यादवच्या खांद्यावर नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आलीये. टी-२० संघाचे नेतृत्व स्विकारल्यानंतर अनेकदा सूर्यकुमार यादवनं हिटमॅन रोहित शर्मासंदर्भात आपल्या मनातील आदर आणि भावना व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले आहे. एवढेच काय कॅप्टन्सीचा पॅटर्न हा रोहितसारखाच असेल, हे देखील त्याने बऱ्याच वेळा बोलून दाखवलं आहे. संघाचे नेतृत्व करताना रोहितच्या पावलावर पाऊल ठेवण्याला तो पसंती देतो.
..अन् रोहितच्या भात्यातून 'कटक'मध्ये आली 'कडक' सेंच्युरी
इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात रोहित शर्मा अवघ्या २ धावांवर बाद झाला होता. पण दुसऱ्या वनडेत त्याने धमाकेदार खेळी केली. ३०० हून अधिक धावसंख्येचा पाठलाग करताना रोहितच्या भात्यातून ११९ धावा आल्या. त्याने आपल्या खेळीत १२ चौकार आणि ७ उत्तुंग षटकारासह यासामन्यात अनेक विक्रमाला गवसणी घातली. त्याचा हा हिटशो चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतही असाच राहावा, अशीच भावना क्रिकेट प्रेमींमध्ये दिसून येत आहे.