India vs England : भारतीय संघाने तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडवर ४३४ धावांनी दणदणीत विजयाची नोंद करून मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली. या सामन्यात शतक व पाच विकेट्स घेणाऱ्या रवींद्र जडेजाला प्लेअर ऑफ दी मॅचच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. राजकोट हे जडेजाचे घरचे मैदान आहे आणि त्याने इथे विक्रमी कामगिरी केली. त्याने हा प्लेअर ऑफ दी मॅचचा पुरस्कार पत्नी रिवाबा जडेजाला समर्पित केला.
रिवाबाला पैसा हवाय, रवींद्रने लग्न केलं नसतं तरी चाललं असतं; जडेजाचे वडील संतापले
एकाच कसोटीत शतक अन् पाच विकेट्स घेणारा तो भारताचा चौथा खेळाडू बनला. पहिल्या डावात ११२ धावा करणाऱ्या रवींद्र जडेजाने दुसऱ्या डावात ४१ धावांत ५ विकेट्स घेतल्या. एकाच कसोटीत शतक व ५ विकेट्स त्याने दोनवेळा घेतल्या, त्याला अश्विनचा विक्रम खुणावतोय. आर अश्विन याने २०११ व २०१६ ( वि. विंडीज) आणि २०२१ ( वि. इंग्लंड) ३ वेळा हा पराक्रम केला आहे. रवींद्र जडेजाने २०२२( १७५* व ५ विकेट्स वि. श्रीलंका) मध्ये प्रथम असा पराक्रम केला होता. विनू मंकड ( 184 & 5/196 vs Eng Lord's 1952) आणि पॉली उम्रीगर ( 172* & 5/107 vs WI Port of Spain 1962) यांच्या नावावरही हा विक्रम आहे.
या कसोटीत रवींद्रने पहिल्या डावात शतक झळकावून कसोटीत ३००० धावांचा टप्पा ओलांडला. भारताकडून कसोटीमध्ये ३ हजारहून अधिक धावा आणि २०० हून अधिक बळी घेणाऱ्यांच्या यादीत जडेजा तिसऱ्या क्रमांकावर आला. कपिल देव यांनी ५२४८ धावांसह ४३४ बळी घेतले आहेत, तर रवीचंद्रन अश्विन (३२७१ धावा, ४९९ बळी) दुसऱ्या क्रमांकावर आहे. जडेजाच्या नावावर २८५ विकेट्स आहेत. प्लेअर ऑफ दी मॅचचा पुरस्कार पत्नीला समर्पित करताना जडेजा म्हणाला, हा पुरस्कार मी माझ्या पत्नीला समर्पित करतो. ती माझ्या मागे खंबीरपणे उभी राहिली आणि मला या प्रवासात नेहमी सपोर्ट केला. ''