नवी दिल्ली : हॅमस्ट्रिंगमुळे भारतीय संघाबाहेर पडलेला अष्टपैलू रवींद्र जडेजा हा इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांच्या मालिकेतून बाहेर बसू शकतो. पहिल्या कसोटीच्या चौथ्या दिवशी धाव घेण्याच्या प्रयत्नात जडेजाला दुखापत झाली. तो दुसरी कसोटी खेळणार नसल्याचे कालच सांगण्यात आले होते. दुसरीकडे लोकेश राहुल हादेखील मांसपेशीच्या दुखण्यामुळे दुसऱ्या कसोटीस मुकणार आहे.
राहुल तिसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघात पुनरागमन करू शकेल. मात्र जडेजाचे पुनरागमन कठीण दिसत आहे. बीसीसीआयच्या सूत्रांनुसार जडेजाचे दुखणे गंभीर आहे. तो एनसीएत दाखल झाला. एनसीएचे वैद्यकीय पथक काय अहवाल देते, यावर त्याचे खेळणे अवलंबून असेल.
रजत पाटीदार, कुलदीपला अंतिम संघात संधी जडेजा आणि लोकेश राहुल यांच्या अनुपस्थितीत रजत पाटीदार आणि कुलदीप यादव यांना इंग्लंडविरुद्ध विशाखापट्टणम येथे शुक्रवारपासून सुरू होत असलेल्या तिसऱ्या कसोटीत अंतिम संघात स्थान मिळेल, अशी शक्यता वर्तविली जात आहे. विराट कोहलीने पहिल्या दोन सामन्यांतून ब्रेक घेतला होता. तो पुढील तीन सामन्यात खेळणार आहे. लोकेश राहुलदेखील तिसऱ्या कसोटीच्या निमित्ताने भारतीय संघात पुनरागमन करणार आहे. अखेरच्या तीन सामन्यांसाठी लवकरच संघ जाहीर होईल. निवडकर्त्यांनी सरफराज खान, सौरभ कुमार आणि वॉशिंग्टन सुंदर यांना संघात स्थान दिले आहे. रजत पाटीदार हादेखील हैदराबाद कसोटीसाठी १५ सदस्यांच्या संघात होता. तो मधल्या फळीत राहुलचे स्थान घेऊ शकतो. जडेजाच्या जागी कुलदीपला खेळविले जाईल. भारतीय संघ चार फिरकीपटू आणि एका वेगवान गोलंदाजासह खेळण्याच्या तयारीत आहे. इंग्लंडने पहिल्या कसोटीत असेच केले होते. असे झाल्यास मोहम्मद सिराज बाहेर बसू शकतो. सरफराज किंवा वॉशिंग्टन सुंदर यांच्यापैकी एकाला मधल्या फळीत स्थान मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. आंध्र क्रिकेट संघटनेच्या या मैदानावर आतापर्यंत दोन कसोटी सामने झाले. खेळपट्टी फलंदाजीला अनुकूल मानली जाते. २०१९ ला या मैदानावर भारताने प्रथम फलंदाजी घेत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ५०२ धावा उभारल्या होत्या. रोहितने सलामीवीराच्या भूमिकेत १७६ धावांची खेळी केली होती.
‘ अंतिम संघात केवळ एका वेगवान गोलंदाजाने काम भागणार असेल तर कुलदीपला खेळवायला हवे. कुलदीपच्या चेंडूत वैविध्य आहे. खेळपट्टीवर चेंडू वळण घेऊ शकतो. दुसरा सामना जिंकून देण्याची जबाबदारी कुलदीप उचलू शकतो.’- अनिल कुंबळे, माजी कर्णधार
‘अष्टपैलू खेळाडू उपयुक्त ठरतो हे खरे आहे; पण अंतिम एकादशमध्ये अधिक बदल करू नयेत. रजत पाटीदारला राहुलऐवजी आणि कुलदीपला जडेजाऐवजी खेळविणे हितावह ठरेल. इंग्लंडची नक्कल करीत चार फिरकी गोलंदाज खेळविण्याची गरज नाही. मायदेशात दोन वेगवान गोलंदाज आणि तीन फिरकी गोलंदाज हीच आमची ताकद असते. त्यावर ठाम रहायला हवे. डावाची सुरुवात शुभमन गिल आणि यशस्वी जैस्वाल यांनी करायला हवी तर रोहित शर्माने तिसऱ्या स्थानावर फलंदाजीसाठी यावे.’- शरणदीपसिंग, माजी निवडकर्ते.