इंग्लंड विरुद्धच्या वनडे मालिकेआधी रोहित शर्माला पुन्हा एकदा भविष्यातील योजनेसंदर्भातील प्रश्न विचारण्यात आल्याचे पाहायला मिळाले. या प्रश्नावर आधी रोहित शर्माचा चेहरा पडला, तो जरा चिडलाही अन् मग त्याने बीसीसीआयचा दाखला देऊन त्याच्यासंदर्भात जो दावा करण्यात येत आहे त्यात तथ्य नाही, असे बोलून दाखवले. रोहित शर्मानं आपल्या खास अंदाजात पुन्हा एकदा निवृत्तीवर अन् क्रिकेट कारकिर्दीतील भविष्यासंदर्भात रंगणाऱ्या चर्चेतील हवा काढली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
...अन् पुन्हा रंगली रोहित शर्माच्या निवृत्तीची चर्चा
भारत आणि इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांच्या वनडे मालिका रंगणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी आधी ही मालिका दोन्ही संघासाठी महत्त्वपूर्ण असेल. या मालिकेला सुरुवात होण्याआधीच चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेनंतर रोहित शर्माला आपल्या भविष्याबद्दलच्या योजना बीसीसीआयला सांगाव्या लागणार आहेत, असा दावा एका वृत्तामध्ये करण्यात आला.हे वृत्त बीसीसीआय रोहित शर्मावर निवृत्ती किंवा कॅप्टन्सीतून बाजूला करण्यासाठी दबाव टाकत आहे, असे चित्र निर्माण करणारे होते. याच प्रार्श्वभूमीवर इंग्लंड विरुद्धच्या सामन्याआधीच्या पत्रकार परिषदेत रोहित शर्माला प्रश्न विचारण्यात आला होता. यावर रोहित शर्मानं आपल्या स्टाईलमध्ये उत्तर दिले.
नेमकं काय म्हणाला रोहित?
इंग्लंड विरुद्धच्या वनडे सामन्याआधी रोहित शर्माला भविष्यातील योजनेसंदर्भातील रिपोर्ट्ससंदर्भातील प्रश्न विचारण्यात आला होता. प्रश्न ऐकून घेतल्यावर भारतीय कर्णधाराचा चेहरा पाडला, तो थोडा चिडूनच म्हणाला की, मी इथं बसून माझ्या भविष्यातील योजनेबद्दल कसं काय बोलू शकतो? आपण तीन वनडे आणि चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेला सामोरे जातोय. असे रिपोर्टस अनेक वर्षांपासून येत आहेत. त्या रिपोर्ट्सचे स्पष्टीकरण द्यायला मी इथं आलेलो नाही. माझा सर्व फोकोस इंग्लंड विरुद्धच्या तीन वनडे सामन्यासह आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेवर आहे. त्यानंतर काय होते ते बघू."
रोहितनं पुन्हा एकदा निवृत्तीच्या चर्चेला ठरवलं अर्थहिन
ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील भारतीय संघाच्या पराभवानंतरही रोहित निवृत्ती घेणार असल्याचे बोलले गेले. सिडनी कसोटी सामन्यात तर कॅप्टन असून रोहित शर्मा बाकावर बसला अन् त्याची कसोटी कारकिर्दी संपली अशी चर्चा आणखी जोर धरू लागली. पण मॅच सुरु असताना रोहित शर्मानं स्टार स्पोर्ट्सला एक मुलाखत दिली अन् निवृत्तीच्या चर्चेला पूर्ण विराम दिला. मी कुठेही जाणार नाही. कधी कोणता निर्णय घ्यायचा ते कळतं, असे म्हणत त्याने निवृत्तीची अफवा पसरवणाऱ्यांची बोलती बंद केली होती. आता पुन्हा एकदा त्याने आपल्या अंदाजात उत्तर देत चर्चित मुद्दा अर्थहिन असल्याचे सांगण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येते.
Web Title: IND vs ENG Rohit Sharma breaks silence on future plans after Champions Trophy as media reports gather pace ahead of England series
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.