Join us  

"अश्विन कसोटी मध्येच सोडून गेला ती गोष्ट माझ्यासाठी..."; रोहित शर्माने मांडलं रोखठोक मत

कौटुंबिक कारण देत अश्विनने सामन्यात दुसऱ्या दिवशी घेतली होती माघार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2024 3:31 PM

Open in App

Rohit Sharma reaction on R Ashwin: टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याने राजकोट कसोटीत संघाला इतिहासातील सर्वात मोठा विजय मिळवून दिला. प्रथम फलंदाजी करताना भारताने ४४५ धावा केल्या. इंग्लंडने प्रत्युत्तरात ३१९ धावा केल्या. पहिल्या डावातील भक्कम आघाडीनंतर दुसरा डाव भारताने ४ गड्यांच्या मोबदल्यात ४३० धावांवर घोषित केला. ५५७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा संपूर्ण डाव १२२ धावांवर आटोपला आणि भारताने तब्बल ४३४ धावांनी विजय मिळवला. या विजयाआधी एक वेगळीच गोष्ट घडली होती. भारताचा अनुभवी फिरकीपटू अश्विन कौटुंबिक कारणास्तव अचानक सामना सोडून घरी निघून गेला. त्यावर अनेक संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. याच मुद्द्यावर आता रोहित शर्माने अधिकृत मत व्यक्त केले आहे.

राजकोट कसोटीत दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर अचानक अश्विनने कसोटी सामना अर्धवट सोडला आणि घरी गेला. तिसऱ्या दिवसाच्या खेळात अश्विन टीम इंडियासोबत नव्हता. मात्र, चौथ्या दिवशी तो पुन्हा टीम इंडियात सामील झाला.  अश्विनला घरी जाण्यासाठी बीसीसीआयने खास चार्टर्ड विमानाचीही व्यवस्था केल्याचे सांगण्यात आले. अश्विन त्याच विमानाने घरी गेला आणि परतही आला. अश्विन प्रकरणावर रोहितने प्रतिक्रिया दिली. रोहित म्हणाला की, जेव्हा आपण कुटुंबाचा विचार करतो तेव्हा मनात दुसरा विचार येत नाही. कुटुंबाला सर्वोच्च प्राधान्य दिले जाते. अश्विनच्या जागी कोणीही असता तर त्यानेही असेच केले असते. सर्वात अनुभवी गोलंदाजाला सामन्याच्या मध्यावर गमावणे सोपे नाही. पण जेव्हा कुटुंबाचा प्रश्न येतो तेव्हा इतर गोष्टी गौण ठरतात. कुटुंब शीर्षस्थानी असते. अश्विनला त्याच्या कुटुंबाकडे जायचे होते आणि या निर्णयात आम्ही सर्वजण त्याच्या पाठीशी उभे होतो. अश्विनने घेतलेला निर्णय पूर्णपणे योग्य होता, असेही रोहित म्हणाला.

राजकोटमध्ये अश्विनची कामगिरी

राजकोट कसोटीतील अश्विनच्या कामगिरीचा विचार केला तर पहिल्या डावात ३७ धावा करण्याव्यतिरिक्त त्याने दोन्ही डावात मिळून २ बळी घेतले. मायदेशातून परतल्यानंतर दुसऱ्या डावात त्याने एक विकेट घेतली. अश्विनने दुसऱ्या डावात फलंदाजी केली नाही. भारताने राजकोट कसोटी ४३४ धावांच्या मोठ्या फरकाने जिंकली आणि या कसोटी मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली.

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडआर अश्विनरोहित शर्माइंग्लंडभारतीय क्रिकेट संघ