Sourav Ganguly On Rohit Sharma Test Form And Captaincy : रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघानं चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा जिंकत नवा इतिहास रचला. दुबईच्या मैदानातील टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय रोहित शर्माच्या कर्तृत्वावर आणि त्याच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थितीत करणाऱ्यांची बोलती बंद करणारा ठरला. त्याचे पडसादही लगेच उमटले. या विजयानंतर रोहित शर्माच भारतीय कसोटी संघाच्या कर्णधारपदी कायम राहणार, अशी चर्चा रंगू लागली. पण सौरव गांगुलीला मात्र आगामी कसोटी दौऱ्याची चिंता सतावत आहे. त्याने रोहित शर्माचा कसोटीतील फॉर्म आणि टीम इंडियाची कामगिरी यावर मोठं वक्तव्य केले आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
रोहित शर्माला 'रेड अलर्ट'
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा जिंकल्यावर बीसीसीआयचा रोहित शर्मावर विश्वास कायम असल्याची चर्चा रंगू लागली आहे. आगामी इंग्लंड दौऱ्यावर त्याच्या नेतृत्वाखालीच टीम इंडियाची बांधणी करण्याचा प्लानही ठरल्याचे बोलले जाते. चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर एका बाजूला रोहित शर्मा आयपीएलमध्ये मग्न असताना भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीनं टीम इंडियाच्या आगामी कसोटी दौऱ्याच्या अनुषंगाने कॅप्टन रोहित शर्माला 'रेड अलर्ट' दिलाय. हा दौरा रोहित शर्मासाठी नवी कसोटी असणार आहे, असे मत त्याने व्यक्त केल्याचे दिसते.
सौरव गांगुलीला सतावतीये ही चिंता
भारतीय संघ व्हाइट बॉल क्रिकेटमध्ये प्रतिस्पर्धी संघाला तगडी फाइट देत असला तरी कसोटीत भारतीय संघाची परिस्थितीत फारशी चांगली नाही, यावर सौरव गांगुलीनं जोर दिलाय. भारतीय संघाचा कसोटी क्रिकेटमधील घसरता आलेख हा चिंताजनक आहे, असे मत गांगुलीने मांडले आहे. रेवस्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीत गांगुली म्हणाला आहे की, “मागील चार-पाच वर्षांत रोहित शर्माच्या कामगिरी पाहून मी हैराण झालोय. त्याने क्षमतेनुसार कामगिरी केल्याचे दिसत नाही. यासंदर्भात त्याला विचार करावा लागेल. कारण इंग्लंड विरुद्धची कसोटी मालिकाही ऑस्ट्रेलिया दौऱ्याप्रमाणेच आव्हानात्मक असेल. व्हाइट बॉल क्रिकेटमध्ये त्याने आपली क्षमता सिद्ध केलीये. पण आता त्याला रेड बॉल क्रिकेटमध्ये सर्वोत्तम कामगिरी करून दाखवण्याचे चॅलेंज स्विकारावे लागेल."
कसोटीतील परिस्थितीत बिकट
गांगुली पुढे म्हणाला की, रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघानं मर्यादित षटकांच्या सामन्यात सातत्याने सर्वोत्तम कामगिरी केलीये. पण कसोटीत मात्र परिस्थितीत खूपच वेगळी आहे. तो कसोटी खेळणं सुरु ठेवणार की, नाही ते मला माहिती नाही, पण जर तो मला ऐकत असेल तर त्याने रेड बॉल क्रिकेटमध्ये जबाबदारी घेऊन या गोष्टी बदलण्याचा प्रयत्न करायला हवा. कसोटीतील स्वत:ची आणि संघाची कामगिरी सुधारण्यासाठी इंग्लंड विरुद्ध काय करावे लागेल? याचा विचार करणे गरजेचे आहे, असा सल्ला सौरव गांगुलीनं रोहित शर्मासह टीम इंडियाला दिला आहे.