Join us  

Shashi Tharoor, IND vs ENG: 'हार-जीत होतच असते, दु:ख एका गोष्टीचं आहे की...'; शशी थरूर यांची 'टीम इंडिया'वर तीव्र नाराजी

भारतीय खेळाडूंवर केली तिरकस शब्दांत टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2022 4:40 PM

Open in App

Shashi Tharoor IND vs ENG, T20 World Cup 2022 च्या दुसऱ्या उपांत्य फेरीत भारताचा इंग्लंडने पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने ६ गड्यांच्या मोबदल्यात १६८ धावा केल्या. हार्दिक पांड्या आणि विराट कोहली यांनी अर्धशतकी खेळी केल्या. पण लोकेश राहुल, रोहित शर्मा, रिषभ पंत, सूर्यकुमार यादव हे अपयशी ठरले. त्यानंतर इंग्लंडकडून सलामीला आलेल्या अलेक्स हेल्स आणि जोस बटलर या जोडीने एकहाती विजय मिळवून दिला. त्यांनी दमदार फलंदाजी करत संघाला १० गडी राखून विजय मिळवून दिली. भारताच्या लाजिरवाण्या पराभवानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार शशी थरूर यांनी टीम इंडियावर नाराजी व्यक्त केली.

भारतीय संघाच्या पराभवाचे खापर कोणा एका खेळाडूवर फोडणे त्यांना पसंत नव्हते. भारतीय संघ सेमीफायनलची लढत खेळत होता, पण त्या सामन्यात त्यांच्या खेळाडूंकडून त्या पद्धतीची कामगिरी झाली नाही, असे थरूर म्हणाले. सामन्यात जिंकणे आणि हारणे हे होतच असते. हार-जीत हा तर खेळाचाच भाग आहे. भारतीय संघ पराभूत झाला त्याचे मला दु:ख नाही. पण मला वाईट एकाच गोष्टीचे वाटते की, त्या खेळाडूंनी १०० टक्के प्रयत्न केल्याचे दिसले नाही. त्यांचे प्रयत्न सर्वोत्तम नव्हते ही गोष्ट माझ्यासाठी जास्त खेदजनक आहे, असे ट्विट त्यांनी केले.

दुसरीकडे, माजी क्रिकेटपटू शेन वॉटसन आणि नासिर हुसेन यांनी गुरुवारी टी२० विश्वचषकात भारताच्या लाजिरवाण्या पराभवानंतर सुमार फलंदाजीवरून टीका केली. अलेक्स हेल्स आणि जोस बटलर या दोघांनी भारतीय गोलंदाजीची अक्षरश: धुलाई केली. दोघांनीही नाबाद अर्धशतके ठोकली. इतकेच नव्हे तर १७० धावांचा पल्ला अवघ्या १६ षटकांत एकही गडी न गमावता गाठला आणि भारताचा १० गडी राखून पराभव केला. त्यामुळे भारताच्या खेळाडूंवर प्रचंड टीका केली.

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२शशी थरूरभारतीय क्रिकेट संघट्विटर
Open in App