IND vs ENG, Semi Final 2: T20 World Cup 2022 स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारत आणि इंग्लंड यांच्यात सामना होणार आहे. एडिलेडमध्ये होणाऱ्या या सामन्यापूर्वी इंग्लंड संघाला मोठा झटका बसला आहे. उपांत्य फेरीपूर्वीच (Semi Final) इंग्लंडचा आणखी एक खेळाडू अनफिट झाल्याचे वृत्त आहे. भारताच्या तुलनेत ग्रुप १ अधिक आव्हानात्मक होता आणि त्याचा सामना करताना इंग्लंडने उपांत्य फेरीतील स्थान पक्के केले. त्यामुळे भारतासाठी ही लढत सोपी नक्कीच नसेल. मात्र, त्याचवेळी आधी त्यांचा स्टार फलंदाज डेव्हिड मलान (Dawid Malan) सामन्याला मुकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यानंतर आता वेगवान गोलंदाज मार्क वूड (Mark Wood) याच्या संघातील समावेशाबाबतही साशंकता आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, वेगवान गोलंदाज मार्क वूड इंग्लंडच्या सराव सत्रातून बाहेर पडला कारण त्याला जायबंदी झाल्यासारखे तसेच शरीरा आखडल्यासारखे वाटू लागले. त्याने तशी माहिती दिली आणि तो निघून गेला. मार्क वूड हा इंग्लंड संघाचा सर्वात मोठा 'मॅचविनर' आहे. मार्क वूडने या टी२० स्पर्धेत ४ सामन्यांत ९ विकेट्स घेतल्या आहेत. तो या T20 विश्वचषकातील सर्वात वेगवान गोलंदाज आहे. त्याने ताशी १५४.७४ वेगाने चेंडू टाकला. तसेच, मार्क वुडने अफगाणिस्तानविरुद्धच्या सुपर-12 सामन्यात सर्वात वेगवान स्पेल फेकली होती, त्यामध्ये त्याचा वेग १४९.०२ किमी प्रति तास इतका होता.
भारताविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात मार्क वूडच्या खेळण्याबाबत साशंकता आहे. तो जर खेळला नाही, तर तो इंग्लिश संघासाठी मोठा धक्का मानला जाऊ शकतो. डेव्हिड मलानलाही दुखापत झाली असून तो उपांत्य फेरीत खेळणार की नाही हे अद्याप निश्चित नाही. वृत्तानुसार, उपांत्य फेरीत त्याच्या जागी फिल सॉल्ट खेळू शकतो. या सामन्यासाठी भारत आणि इंग्लंडचे संघ जोरदार सराव करत आहेत. मंगळवारी विराट कोहली, कर्णधार रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक यांनी नेट्समध्ये सराव केला. या सामन्यात भारताकडूनही दोन बदल अपेक्षित असल्याचे बोलले जात आहेत.