IND vs ENG T20I : पाचव्या कसोटीत जो रुट व जॉनी बेअरस्टो यांनी ट्वेंटी-२० फटकेबाजी करताना टीम इंडियावर दणदणीत विजय मिळवला. इंग्लंडने ही कसोटी ७ विकेट्स राखून जिंकून मालिका २-२ अशी बरोबरीत सोडवली. आता गुरुवारपासून भारत-इंग्लंड ( England vs India) यांच्यातल्या ट्वेंटी-२० मालिकेला सुरुवात होणार आहे. इयॉन मॉर्गन याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर इंग्लंडच्या मर्यादित षटकांच्या संघाची जबाबदारी जोस बटलर ( Jos Buttler) कडे सोपवण्यात आली आहे. त्याने कसोटी विजयातून प्रेरणा घेत ट्वेंटी-२० मालिकेला सुरूवात होण्याआधीच टीम इंडियाला चॅलेंज दिले आहे.
''एडबस्टनवर इंग्लंडचा खेळ अविश्वसनीय झाला. या अविश्वसनीय कसोटी विजयातून प्रेरणा घेत आम्ही इंग्लंडचा विजयरथ असाच पुढे कायम ठेवणार आहे, ''असे बटलरने म्हटले. बटलर प्रथमच इंग्लंडच्या संघाचे नेतृत्व सांभाळणार आहे आणि पहिल्याच परीक्षेत त्याच्यासमोर तगड्या टीम इंडियाचे आव्हान आहे. पण, बटलरचा फॉर्म हा भारतीय गोलंदाजांची चिंता वाढवणारा आहे. नेदरलँड्सविरुद्धच्या वन डे मालिकेत बटलरने १७२ धावांची दमदार खेळी केली होती. भारताविरुद्ध ट्वेंटी-२० मालिकेतील त्याची कामगिरी चांगली झालेली आहे. १७ सामन्यांत त्याने ३३.९०च्या सरासरीने ३७३ धावा केल्या आहेत. नाबाद ८३ ही त्याची भारताविरुद्धची सर्वोत्तम कामगिरी आहे.
इंडियन प्रीमिअर लीग २०२२मध्ये त्याने सर्वाधिक धावा करून ऑरेंज कॅप नावावर केली होती. एजीस बाऊल येथे भारतीय संघाने ८ ( ३ कसोटी व ५ वन डे) सामने खेळले आहेत. भारताला तीनही कसोटी सामने येथे गमवावे लागले, तर वन डेतही त्यांना यजमानांना एकाही सामन्यात पराभूत करता आलेले नाही.
पहिल्या ट्वेंटी-20 साठी भारताचा संघ- रोहित शर्मा ( कर्णधार), इशान किशन, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, दीनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, वेंकटेश अय्यर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्षदीप सिंग, उम्रान मलिक
दुसऱ्या व तिसऱ्या ट्वेंटी-20 साठी भारताचा संघ - रोहित शर्मा, इशान किशन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, रिषभ पंत, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, हर्षल पटेल, उम्रान मलिका
इंग्लंडचा ट्वेंटी-२० संघ - जोस बटलर ( कर्णधार), मोईन अली, हॅरी ब्रूक, सॅम कुरन, रिचर्ड ग्लीसन, ख्रिस जॉर्डन, लिएम लिव्हिंगस्टोन, डेवीड मलान, टायमल मिल्स, मॅथ्यू पर्किसन, जेसन रॉय, फिल सॉल्ट, रिस टॉप्ली, डेव्हिड विली.