IND vs ENG: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील अखेरच्या सामन्यात अभिषेक शर्मानं तुफान फटकेबाजीचा नजराणा पेश केला. मुंबईतील वानखेडेच्या मैदानात उपस्थितीत क्रिकेट चाहत्यांपासून ते लोकप्रिय सेलिब्रिटी आमिर खान, बिग बी अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चनसह उद्योगपती मुकेश अंबानी यांनी अभिषेक शर्माच्या खेळीला स्टँडमध्ये उभे राहून दाद दिल्याचे पाहायला मिळाले. या गर्दीत आता अभिषेक शर्माला घडवण्यात मोलाचा वाटा उचलणाऱ्या युवराज सिंगचाही समावेश झाला. भारताचा माजी क्रिकेटर आणि सिक्सर किंग युवराज सिंगनं खास मेसेजसह चेल्याच्या खेळीच कौतुक केल्याचे पाहायला मिळाले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
क्लास इनिंगनंतर अभिषेक शर्मानं न विसरता शेअर केली होती युवीच्या छत्र छायेतील गोष्ट
आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधील दुसऱ्या आणि विक्रमी शतकानंतर अभिषेक शर्मानं गुरु युवराज सिंगसंदर्भातील आदर आणि त्याने दिलेले धडे यासंदर्भातील स्टोरी शेअर केली होती. आपल्या यशात युवराज सिंगचा वाटा मोलाचा असल्याचे तो म्हणाला होता. युवराज सिंगनं ट्रेनिंग वेळी बूस्ट दिल्याचा किस्साही त्याने शेअर केला होता. आता युवराज सिंगनं खास शब्दांतील मेसेजसह अभिषेकच्या खेळीला दाद दिलीये.
युवीनं मोजक्या अन् खास शब्दांत अभिषेकच्या खेळीला दिली दाद, म्हणाला...
युवराज सिंगनं एक्स अकाउंटवरुन मोजक्या शब्दांतील संदेशासह युवा आणि स्फोटक सलामीवीराच्या खेळीला दाद दिलीये. त्याने एक्स अकाउंटवरील मेसेजमध्ये लिहिलंय की, खूप भारी खेळलास अभिषेक! मला तुझ्याकडून अशाच कामगिरीची अपेक्षा आहे. मला तुझा अभिमान वाटतो. अशा शब्दांत युवीनं आपल्या चेल्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. युवराज सिंगचं हे ट्विट चांगलेच व्हायरल होताना दिसत आहे.
युवीनं सिंगल डबलवरी लक्ष देत जा, असाही दिला होता सल्ला
अभिषेक शर्मानं इंग्लंड विरुद्धच्या पाचव्या टी-२० सामन्यात ५४ चेंडूत १३५ धावांची खेळी केली होती. त्याच्या या खेळीत ७ चौकार आणि १३ उत्तुंग षटकारांचा समावेश होता. अभिषेक शर्मा हा आक्रमक अंदाजात बॅटिंग करण्यासाठी ओळखला जातो. याआधी युवीनं त्याला फक्त सिक्सर मारण्यावर जोर देण्यापेक्षा कधी कधी सिंगलही घेत जा, अशी टिप्स दिल्याचे पाहायला मिळाले होते. इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात त्याने स्ट्राइक रोटेट करत ही झलकही दाखवून दिली.
Web Title: IND vs Eng T20I Yuvraj Singh Praised Abhishek Sharma After Record Break Century During India vs England T20I Match At Wankhede Stadium Mumbai
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.