नवी दिल्ली: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघ जाहीर झाला आहे. भारतीय संघ आगामी काळात मायदेशात इंग्लंडविरूद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार असून यासाठी शुक्रवारी भारतीय संघाची घोषणा झाली. मालिकेच्या पहिल्या दोन सामन्यांसाठी काही नव्या चेहऱ्यांना संघात स्थान मिळाले आहे. तर, इशान किशनला वगळले. लोकेश राहुल, केएस भरत आणि ध्रुव जुरेल या तीन यष्टीरक्षक फलंदाजांना संधी देण्यात आली आहे.
पहिल्या दोन सामन्यांसाठी भारतीय संघ -
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह आणि आवेश खान.
ध्रुव जुरेलला संधी
भारतीय संघात युवा ध्रुव जुरेलला स्थान मिळाले आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये तो उत्तर प्रदेशकडून खेळतो. २३ वर्षीय ध्रुव १९ वर्षाखालील भारत अ संघाकडून खेळला आहे. त्याचा देशांतर्गत क्रिकेटमधील रेकॉर्ड चांगला आहे. ध्रुवने १५ प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. यामध्ये ७९० धावा केल्या आहेत. या काळात त्याने एक शतक आणि पाच अर्धशतके झळकावली. यासोबतच ध्रुवने इंडियन प्रीमियर लीगमध्ये देखील कमाल दाखवली आहे.
अफगाणिस्तानविरूद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेसाठी संघाचा हिस्सा नसलेल्या जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांची इंग्लंडविरूद्धच्या मालिकेतून एन्ट्री होणार आहे. ट्वेंटी-२० मालिकेतून दोघांनाही ब्रेक देण्यात आला आहे. आवेश खान आणि मुकेश कुमार यांना संघात जागा मिळवण्यात यश आले आहे. अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांचाही टीम इंडियात समावेश आहे. रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन हे अष्टपैलू खेळाडूही इंग्लंडविरुद्ध टीम इंडियात स्थान मिळवण्यात यशस्वी ठरले. मात्र इशान किशनला संधी देण्यात आलेली नाही. इशानबद्दल अनेक अफवा पसरल्या होत्या. पण, मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने सांगितले होते की, इशानने बीसीसीआयकडे सुटी मागितली आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यात २५ जानेवारीपासून पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना हैदराबादमध्ये होणार आहे. भारताने पहिल्या दोन सामन्यांसाठी संघ जाहीर केला आहे. अनुभवी वेगवान गोलंदाज शमी संघाचा भाग नाही. २०२३ च्या विश्वचषकात शमीने घातक गोलंदाजी केली होती. त्याला नुकतेच अर्जुन पुरस्कारानेही गौरविण्यात आले आहे. मात्र, दुखापतीमुळे शमी अद्याप तरी क्रिकेटपासून दूर आहे.
Web Title: ind vs eng Team India's squad for the first two Tests against England announced, read here details
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.