देशांतर्गत क्रिकेटमध्ये मागील दोन वर्षांपासून चमकदार कामगिरी करणाऱ्या सर्फराज खानला भारतीय संघाचे तिकिट मिळाले आहे. मुंबईकर सर्फराजला इंग्लंडविरूद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी संधी मिळाली आहे. लोकेश राहुल आणि रवींद्र जडेजा यांनी दुखापतीमुळे माघार घेतली. म्हणूनच सर्फराजसह युवा खेळाडू सौरभ कुमारला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रवेश करण्याची संधी मिळाली. या दोघांशिवाय वॉशिंग्टन सुंदरही संघात सामील झाला आहे. पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना जिंकून पाहुण्या इंग्लंडने १-० अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे दुसरा सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधण्याचे आव्हान यजमान भारतासमोर असेल.
शुक्रवारपासून दुसऱ्या कसोटी सामन्याचा थरार रंगणार आहे. सर्फराज भारतीय संघासोबत जोडला गेला असून त्याची झलक बीसीसीआयने शेअर केली आहे. भारताचा युवा शिलेदार कर्णधार रोहित शर्मासह इतर सहकाऱ्यांसोबत सराव करताना दिसला. भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना २ फेब्रुवारीपासून विशाखापट्टणम येथे खेळवला जाणार आहे.
रोहित आवडता खेळाडू - सर्फराजभारताच्या आंतरराष्ट्रीय संघात स्थान मिळवण्यासाठी झटणाऱ्या सर्फराजला टीम इंडियात संधी मिळाली अन् त्याच्या कुटुंबीयांसह त्याने आनंद व्यक्त केला. सर्फराजने कर्णधार रोहित शर्माची लोकप्रियता आणि त्याच्या तीन द्विशतकांवर प्रकाश टाकला. सर्फराजने रोहितचे कौतुक केले. रोहित आपला आवडता खेळाडू असल्याचे सर्फराजने सांगितले. हिटमॅनमध्ये पुल शॉट मारण्याची असलेली क्षमता माझ्यासह अनेकांना भुरळ घालते. त्याला खेळताना पाहताना मजा येते. ड्रेसिंगरूममध्ये देखील सर्व खेळाडू रोहितच्या तीन द्विशतकांबद्दल बोलत असतात, असे सर्फराजने नमूद केले. तो 'स्पोर्ट्स यारी'शी बोलत होता.
सर्फराज खान सातत्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत होता. परंतु त्याला संधी मिळू शकलेली नव्हती. राहुल आणि जडेजा यांच्या दुखापतीचा सर्फराजला अप्रत्यक्षपणे फायदाच झाला अन् त्याला संघात स्थान देण्यात आले आहे. दुसरा कसोटी सामना २ फेब्रुवारीपासून विशाखापट्टणम येथे खेळवला जाणार आहे.
दुसऱ्या सामन्यांसाठी बदललेला भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, सर्फराज खान, केएस भरत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, सौरभ कुमार आणि आवेश खान.