Join us  

दोन सामन्यात १८ धावा करणाऱ्या इंग्लंडच्या फलंदाजाने दिली टीम इंडियाला 'वॉर्निंग', म्हणाला...

२५ जानेवारीपासून सुरू होणार भारत-इंग्लंड ५ सामन्यांची कसोटी मालिका

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2024 9:28 AM

Open in App

Ben Duckett on Spin pitches, IND vs ENG Test : भारतीय संघाची दक्षिण आफ्रिकेविरूद्धची कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली. त्यानंतर अफगाणिस्तान विरूद्ध भारताने टी२० मालिका सहज जिंकली. आता इंग्लंडचा संघ भारतात येणार आहे. २५ जानेवारी ते ११ मार्च या कालावधीत रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारत विरूद्ध इंग्लंड अशी पाच सामन्यांची कसोटी मालिका रंगणार आहे. या मालिकेसाठी भारताकडून पहिल्या दोन सामन्यांचा संघ जाहीर करण्यात आला आहे. संघात फिरकीपटूंचा भरणा आहे. याच धर्तीवर आता इंग्लंडच्या खेळाडूंकडून विधाने येण्यास सुरुवात झाली आहे. इंग्लंडचा एक डावखुरा फलंदाज बेन डकेट याने भारतीय गोलंदाजांना, विशेषकरून आर अश्विनसारख्या फिरकीपटूंना थेट आव्हानच दिले आहे.

२०१६ मध्ये भारत दौऱ्यावर आलेल्या बेन डकेटने कसोटी मालिकेच्या २ सामन्यात केवळ १८ धावा केल्या होत्या. पण आता मात्र तो आक्रमक खेळ करण्याबाबत बोलला आहे. "भारतीय खेळपट्ट्या या फिरकी गोलंदाजीला जास्त मदत करत असतील तर मला माझा खेळ कसा खेळायचा हे चांगलं माहिती आहे. मला माझी बलस्थाने माहिती आहेत. चेंडू जास्त स्पिन होत असेल तर मला काहीच आश्चर्य वाटणार नाही. तसे झाल्यास धावसंख्या हलती ठेवणे आणि एकेरी-दुहेरी धावा काढत संघाची धावसंख्या वाढवण्यावर माझा भर असेल. धावा काढणं कठीण होऊन बसलं तर मात्र एखाद्या ठराविक गोलंदाजावर आक्रमण करण्यावाचून पर्याय नसेल. चेंडू जितका स्पिन होत राहिल तितकी मी आडव्या बॅटने फटकेबाजी करेन, आक्रमक खेळ करेन, संयमी खेळत बसणार नाही," असे बेन डकेटने स्पष्टपणे सांगितले.

"स्पिनर्ससाठी मदत करणारी खेळपट्टी असेल तर त्या वेळी संघासाठी ५०-६० धावांची खेळीदेखील उपयुक्त ठरू शकेल. संघाची धावसंख्या वाढवण्यासाठी संयमी खेळी करून दाखवावीच लागेल. भारतीय संघाकडे वेगवान गोलंदाजांची चांगली फळी आहे. पण स्पिनर्सला मदत मिळणारी खेळपट्टी असेल तर वेगवान गोलंदाजांवर हल्ला चढवावा लागेल. त्याशिवाय धावा होणार नाहीत. आमचे कोच आम्हाला आक्रमक खेळ करण्यासाठी स्वातंत्र्य देतात. त्याचा आम्हाला फायदाच होईल. कारण या संघात खेळण्याचा आणखी एक उपयोग असा आहे की परिस्थिती जितकी विचित्र असेल तितके खेळायचे स्वातंत्र्य अधिक मिळते. त्यामुळे आम्ही खेळपट्टीचा अंदाज घेऊन मग तुफान फटकेबाजीला सुरुवात करु," असेही बेन डकेट म्हणाला.

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडभारतीय क्रिकेट संघइंग्लंडरोहित शर्माआर अश्विन