भारत आणि इंग्लंड यांच्यात कसोटी मालिकेचा थरार रंगला आहे. पहिला सामना जिंकून पाहुण्या इंग्लंडने विजयी सलामी दिली. पण दुसऱ्या सामन्यात मोठा विजय मिळवून भारताने मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. भारताचे आघाडीचे फलंदाज सध्या खराब फॉर्मचा सामना करत आहेत. याला यशस्वी जैस्वाल आणि शुबमन गिल यांच्या खेळी अपवाद ठरल्या. दुसऱ्या सामन्यातील पहिल्या डावात यशस्वी जैस्वालने द्विशतकी खेळी केली, तर दुसऱ्या डावात शुबमन गिलच्या शतकामुळे भारताला मोठी आघाडी घेता आली. पण, पहिल्या दोन सामन्यात भारताच्या श्रेयस अय्यरची बॅट शांत राहिली. त्याला साजेशी देखील कामगिरी करता आली नाही.
श्रेयस अय्यरचा फॉर्म टीम इंडियासाठी चिंतेचा विषय ठरत आहे. त्याने दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या चार डावांमध्ये केवळ ४१ धावा केल्या. इंग्लंडविरूद्धच्या दोन सामन्यातील चार डावांमध्ये त्याला १०४ धावा करता आल्या आहेत. त्यामुळे श्रेयस अय्यरने देशांतर्गत क्रिकेटकडे परतावे तिथे धावा कराव्यात आणि मग आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळावे असा सल्ला भारताचा माजी खेळाडू प्रज्ञान ओझाने दिला आहे.
ओझाने सांगितले की, श्रेयस अय्यर सध्या खराब फॉर्मचा सामना करत आहे. विराट कोहली संघाबाहेर आहे, लोकेश राहुल देखील चांगल्या लयनुसार खेळत आहे. तो संघाबाहेर असला तरी पुनरागमन करेल तेव्हा थेट प्लेइंग इलेव्हनचा भाग होईल. विराटसारखा महान खेळाडू जेव्हा परतेल तेव्हा त्याला संघात स्थान दिले जाईल. त्यामुळे मी अय्यरला सल्ला देईन की, त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये जावे आणि धावा करून पुनरागमन करावे. ओझा NDTV या वृत्तसंस्थेशी बोलत होता.
भारताचा १०६ धावांनी विजय
दुसरा कसोटी सामना जिंकून यजमान भारताने मालिकेत बरोबरी साधली. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारताने पहिल्या डावात ३९६ धावा केल्या होत्या. यशस्वी जैस्वालच्या द्विशतकी खेळीच्या जोरावर यजमानांनी धावांचा डोंगर उभारला. याला प्रत्युत्तर देताना इंग्लिश संघ आपल्या पहिल्या डावात २५५ धावा करू शकला. भारताने दुसऱ्या डावात २५३ धावा करून मजबूत आघाडी घेतली. पाहुण्या इंग्लंडला विजयासाठी ३९९ धावांची आवश्यकता होती. पण, इंग्लिश संघ आपल्या दुसऱ्या डावात अवघ्या २९२ धावांवर गारद झाला अन् भारताने १०६ धावांनी मोठा विजय मिळवला. भारताकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक ९ बळी घेतले. पहिल्या डावात ६ आणि दुसऱ्या डावात ३ बळी घेण्यात बुमराहला यश आले.
Web Title: IND vs ENG test series Shreyas Iyer should play and score runs in domestic cricket, says former India player Pragyan Ojha
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.