धर्मशाला: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा त्याच्या विनोदी शैलीमुळे नेहमी चर्चेत असतो. मैदानात असो की मग मैदानाबाहेर सर्वांचा लाडका हिटमॅन नेहमी चाहत्यांचे मनोरंजन करत असतो. गुरूवारपासून भारत आणि इंग्लंड यांच्यात कसोटी मालिकेतील अखेरचा सामना खेळवला जात आहे. भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत ३-१ अशी विजयी आघाडी घेतली आहे. भारतीय कर्णधार रोहित आता एका भन्नाट कारणामुळे प्रसिद्धीच्या झोतात आला आहे. इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेदरम्यान स्टम्प माईकमध्ये टिपलेला त्याचा आवाज चाहत्यांना भुरळ घालून गेला. यावरून अनेक भन्नाट मीम्स व्हायरल झाले.
दरम्यान, धर्मशाला येथे होणाऱ्या पाचव्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यापूर्वी हिटमॅनला स्टम्प माईकमध्ये रेकॉर्ड होत असलेल्या संभाषणाबद्दल विचारण्यात आले तेव्हा त्याचे उत्तर ऐकण्यासारखे होते. केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्यासह रोहितने मंगळवारी क्रीडा महाकुंभला हजेरी लावली.
हिटमॅनची जोरदार बॅटिंग
पाचव्या कसोटीपूर्वी ५ मार्च रोजी कर्णधार रोहित आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्या उपस्थितीत हिमाचल प्रदेशमधील बिलासपूर येथे 'संसद खेल महाकुंभ' येथील कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी क्रीडामंत्र्यांसह टीम इंडियाचा कर्णधार आणि प्रशिक्षक यांच्या हस्ते खेल महाकुंभच्या जर्सीचेही प्रकाशन करण्यात आले. यावेळी उद्घाटन समारंभाचे सूत्रसंचालन करणाऱ्या अपारशक्ती खुरानाने भारतीय कर्णधार रोहित शर्माला काही भन्नाट प्रश्न विचारले. स्टम्प माईकमध्ये टिपलेल्या संभाषणात तू म्हणाला होता की, एकदा अम्पायरने तुला धाव दिली नव्हती, तो चेंडू बॅटला लागला होता अशी तू मागणी केली होतीस... खुरानाने हा प्रश्न विचारताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
रोहित शर्माने मिश्किलपणे उत्तर देताना म्हटले की, मी त्याच्या मागील दोन डावात शून्यावर बाद झालो होतो. त्यामुळे मी पुन्हा शून्यावर बाद होईल याची भीती वाटायची... मी दबावात असताना अम्पायरने एक चुकीचा निर्णय दिला. चेंडू माझ्या बॅटला स्पर्श करून सीमारेषेकडे गेला तरीही मला ४ धावा मिळाल्या नाहीत. पण जेव्हा मी स्कोअरकार्ड बघितले तेव्हा तिथे शून्य लिहिले होते. मग मी अम्पायरला विचारले की, अरे वीरू, तू मला थाई पॅड दिलास का? तसेच मी धावफलक पाहून फलंदाजी करत नाही, असेही रोहितने यावेळी नमूद केले.
पाचव्या कसोटीसाठी भारतीय संघ -
रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटिदार, सर्फराज खान, ध्रुव जुरेल, केएस भरत, देवदत्त पडिक्कल, आर. अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, आकाश दीप.
Web Title: IND vs ENG Test Series Team India captain Rohit Sharma shared a funny anecdote from the stump mic in front of Sports Minister Anurag Thakur and coach Rahul Dravid
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.