इंग्लंडच्या बॅझबॉल फलंदाजीची हवा काढताना भारतीय संघाने दुसऱ्या कसोटीत १०६ धावांनी दणदणीत विजय मिळवला. यासह पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत दिमाखात पुनरागमन केलेल्या भारताने १-१ अशी बरोबरी साधली. पहिल्या डावात ६, तर दुसन्या डावात ३ असे सामन्यात एकूण ९ बळी घेत वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह सामनावीर ठरला.
आता तिसरा सामना १५ फेब्रुवारीपासून राजकोटमध्ये खेळवला जाणार आहे. मालिकेतील शेवटच्या ३ कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा अद्याप झालेली नाही. यासाठी बीसीसीआयचे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर विशाखापट्टणमला पोहोचले. भारताने सामना जिंकल्यानंतर त्यांनी कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांची भेट घेतल्याचे दिसून आले. तसेच संघ जाहीर करण्याआधी एक छोटी बैठक देखील झाल्याचे सांगण्यात येत आहे.
आज (६ फेब्रुवारी) उर्वरित ३ कसोटी सामन्यांसाठी संघाची घोषणा होऊ शकते. विराट कोहली पहिल्या दोन सामन्यांतून बाहेर होता. तर दुसऱ्या कसोटीत केएल राहुल, रवींद्र जडेजा दुखापतीमुळे बाहेर होते. अशा स्थितीत कोहली आणि राहुलचे शेवटच्या तीन सामन्यांमध्ये पुनरागमन होऊ शकते. तर जडेजाची दुखापत गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. तो मालिकेतून बाहेर पडू शकतो. दुसरीकडे, श्रेयस अय्यरला पहिल्या दोन सामन्यात फलंदाजीत आपली छाप सोडता आली नाही. खराब कामगिरी त्याला पुढील तीन सामन्यांतून बाहेर काढू शकते. अशीच अवस्था वेगवान गोलंदाज मुकेश कुमारची होती. दुसऱ्या कसोटीत मुकेश कुमारला छाप पाडता आली नाही.
श्रेयसचा खराब फॉर्म-
फलंदाजांना दमदार कामगिरी करावी लागेल, असे संकेत कर्णधार रोहितने सामन्यानंतर दिले आहे. श्रेयस अय्यरचा गेल्या १२ डावांमध्ये फारच खराब फॉर्म होता. या काळात त्याला एकही अर्धशतक करता आले नाही. कानपूरमध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या पदार्पणाच्या सामन्यात श्रेयसचे एकमेव कसोटी शतक. त्यानंतर त्याने सामन्याच्या दोन डावात १०५ आणि ६५ धावा केल्या. त्याचा खराब फॉर्म त्याला संघातून बाहेर काढू शकतो.