IND vs ENG Test Series: सध्या भारत आणि इंग्लंड यांच्यात कसोटी मालिकेचा थरार रंगला आहे. आताच्या घडीला मालिका १-१ अशा बरोबरीत आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरी कसोटी १५ फेब्रुवारीपासून खेळवली जाणार आहे. राजकोटमध्ये दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. हैदराबाद कसोटीत इंग्लिश संघाने भारताचा पराभव केला होता. यानंतर टीम इंडियाने विशाखापट्टणममध्ये मोठा विजय मिळवत मालिकेत बरोबरी साधली. इंग्लंडविरुद्धच्या अखेरच्या ३ कसोटी सामन्यांसाठी युवा आकाश दीपला टीम इंडियात संधी मिळाली आहे. म्हणजेच आकाश दीप इंग्लंडविरुद्धच्या उर्वरित ३ कसोटी सामन्यांमध्ये टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनचा भाग असू शकतो.
आकाश दीपला टीम इंडियात संधी२७ वर्षीय आकाश दीपने आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू व्यतिरिक्त देशांतर्गत क्रिकेटमध्ये प्रतिनिधित्व केले आहे. आकाश दीपने २९ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये १०३ बळी घेतले आहेत. या युवा गोलंदाजाने ४ वेळा एका डावात ५ बळी घेण्याची किमया साधली. याशिवाय एका सामन्यात १० बळी देखील आकाश दीपने घेतले आहेत. अलीकडेच आकाश दीप इंग्लंड लायन्सविरुद्ध दिसला होता. आकाश दीपने इंग्लंड लायन्सविरुद्धच्या ३ सामन्यांत १३ बळी घेतले. आकाश दीपला २०२२ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या फ्रँचायझीने २० लाख रूपयांत खरेदी केले होते. त्याने सात सामन्यांत सहा बळी घेतले.
अखेरच्या तीन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, लोकेश राहुल, रजत पाटीदार, सर्फराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, आकाश दीप.
अष्टपैलू रवींद्र जडेजा आणि लोकेश राहुल यांचे संघात पुनरागमन झाले आहे. परंतु वैद्यकीय संघाकडून फिटनेसबाबत मंजुरीनंतरच त्यांचा संघात सहभाग शक्य होईल. म्हणजेच जडेजा आणि राहुल संघात परतले असले तरी ते खेळतील याबाबत निश्चिती नाही. जडेजा आणि राहुलला दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटी सामन्यातून बाहेर राहावे लागले होते.