IND vs ENG Test: रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघाने अलीकडेच इंग्लंडविरूद्धची कसोटी मालिका जिंकली. पाच सामन्यांच्या मालिकेत भारताने ४-१ असा विजय मिळवला. या मालिकेतील तिसऱ्या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताचा स्टार फिरकीपटू आर अश्विनला अचानक घरी जावे लागले होते. नंतर समोर आले की, त्याच्या आईची तब्येत ठीक नव्हती. पण, अश्विन एक दिवसानंतर लगेचच सामना खेळण्यासाठी पोहोचला होता. आता अश्विनने याबद्दल एक मोठा खुलासा केला आहे.
अश्विन त्याच्या यूट्यूब चॅनेलवर बोलत असताना त्याने सांगितले की, आईची तब्येत ठीक नसल्याचे कळताच मला अश्रू अनावर झाले. त्यानंतर कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी त्याला रूममध्ये जाण्यास सांगितले. पण, तेव्हा राजकोटवरून एकही फ्लाइट नव्हती. अशा स्थितीत रोहितने जे केले त्याचे कौतुक करावे तितके कमीच आहे. रोहितने चार्टर प्लेनची व्यवस्था करून दिली.
अश्विनने तिसऱ्या कसोटी सामन्यातून आपल्या कारकिर्दीतील ५०० कसोटी बळी पूर्ण केले. यानंतर त्याच्या आईची तब्येत ठीक नसल्याचे त्याला समजले अन् घरी परतावे लागले. अश्विनने सांगितले की, त्याने राजकोट ते चेन्नईची फ्लाइट शोधायला सुरुवात केली, पण त्याला कोणतीही फ्लाइट सापडली नाही. राजकोट विमानतळ संध्याकाळी ६ वाजता बंद होते. अश्विन तणावात असताना रोहित आणि द्रविड यांनी त्याला रूममध्ये जाण्याचा सल्ला दिला अन् भारतीय कर्णधाराने पुढील नियोजन केले.
अश्विनची ऐतिहासिक 'कसोटी'अश्विनने इंग्लंडविरूद्धचा पाचवा कसोटी सामना खेळून इतिहास रचला. १०० कसोटी सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारा अश्विन हा १४वा आणि एकूण ७७वा क्रिकेटपटू ठरला आहे. अश्विनपूर्वी ही कामगिरी करणाऱ्या १३ भारतीय खेळाडूंमध्ये सुनील गावस्कर ( १२५ ), दिलीप वेंगसरकर ( ११६ ), कपिल देव ( १३१ ), सचिन तेंडुलकर ( २०० ), अनिल कुंबळे ( १३२ ), राहुल द्रविड ( १६४ ), सौरव गांगुली ( ११३ ), व्हीव्हीएस लक्ष्मण ( १३४ ), हरभजन सिंग ( १०३ ), वीरेंद्र सेहवाग ( १०४ ), इशांत शर्मा ( १०५ ), विराट कोहली ( ११३ ) आणि चेतेश्वर पुजारा ( १०३) यांचा समावेश आहे.