भारतीय संघ मायदेशात इंग्लंडविरूद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. आजपासून या मालिकेला सुरूवात झाली असून, सलामीचा सामना हैदराबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जात आहे. टीम इंडियाची मायदेशातील कामगिरी शानदार राहिली आहे, याचाच दाखला देत भारताचा माजी कर्णधार अनिल कुंबळेने एक मोठा दावा केला आहे. भारतीय संघ पाच सामन्यांच्या मालिकेत ४-१ असा विजय मिळवेल, असे त्याने म्हटले आहे.
अनिल कुंबळे म्हणाला की, इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांकडे अनुभवाची कमतरता आहे. त्यामुळे भारताचा विजय निश्चित आहे. जॅक लीच फिरकी आक्रमणाचे नेतृत्व कसे करतो यावर सर्व काही अवलंबून असेल. निश्चितच इंग्लंडच्या संघाने खेळपट्टीकडे लक्ष दिले आहे. त्यांनी बेन फोक्सचा संघात समावेश केला आहे, म्हणजे संघात फक्त एकच वेगवान गोलंदाज असेल. बेन स्टोक्स किती गोलंदाजी करेल याची कल्पना नाही. त्यामुळे पाहुणा संघ कशी कामगिरी करतो हे पाहणे मनोरंजक असेल परंतु त्यांची ही गोलंदाजीची फळी खूपच अननुभवी आहे. कुंबळे जिओ सिनेमावर सामन्याचे विश्लेषण करत असताना बोलत होता.
भारत ४-१ ने मालिका जिंकेल - कुंबळे
तसेच रेहान अहमदसारख्या खेळाडूंना ही मालिका आव्हानात्मक असणार आहे. युवा फिरकीपटू खासकरून रेहान आणि टॉम हार्टली यांच्यावर भारतीय फलंदाजांना अडचणीत आणण्याची मोठी जबाबदारी असेल. मी भविष्यवाणी करू इच्छित नाही पण निश्चित सांगू शकतो की, भारत आरामात ही मालिका जिंकेल. भारत पाच सामन्यांमधील ४ सामने जिंकून मालिका ४-१ अशा फरकाने जिंकेल, असेही कुंबळेने सांगितले.
पहिल्या सामन्यासाठी भारतीय संघ -
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, केएस भरत, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, आर अश्विन, मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह.
पहिल्या सामन्यासाठी इंग्लंडचा संघ -
बेन स्टोक्स (कर्णधार), जोनी बेअरस्टो, झॅक क्रॅव्ली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, बेन फोक्स, रेहान अहमद, टॉम हार्टली, मार्क वूड, जॅक लिच.
Web Title: IND vs ENG Test Team India will win the Test series against England 4-1, claims former India captain Anil Kumble
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.